रशियावरील निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर पाश्‍चिमात्य देशांवर इंधनाचे रेशनिंग करण्याची वेळ ओढवेल

- ‘आयईए`च्या प्रमुखांचा इशारा

पॅरिस – रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे 1970 सालच्या ‘ऑईल क्रायसिस`पेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात अमेरिका व युरोपिय देशांमध्ये इंधनाचे रेशनिंग करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी`चे(आयईए) प्रमुख फातिह बिरॉल यांनी दिला. 1970 साली फक्त कच्च्या तेलाची टंचाई होती, मात्र आता कच्च्या तेलासह नैसर्गिक इंधनवायू व वीजेचीही समस्या आहे, याकडे बिरॉल यांनी लक्ष वेधले. युरोपिय महासंघाने रशियातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदीचा निर्णय घेतला असतानाच हा इशारा समोर आला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीच्या संकटातून जागतिक अर्थव्यवस्था बाहेर पडत असतानाच अनेक देशांमध्ये इंधन व ऊर्जेची मागणी अचानक मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र मर्यादित उत्पादन व जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे जगातील आघाडीच्या देशांना ‘एनर्जी क्रायसिस`ला तोंड द्यावे लागले होते. त्यात अमेरिका व चीनसह युरोपिय देशांचाही समावेश होता. चीनने इंधनाची आयात वाढवून, तर अमेरिकेने आपले ‘स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह` खुले करून इंधनाच्या संकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी केल्याचे चित्र उभे केले.

पण युरोपिय देशांमधील इंधन व ऊर्जा क्षेत्रातील संकट पूर्णपणे निवळले नसून युक्रेन युद्धाने त्यात अधिकच भर घातल्याचे दिसत आहे. युरोपिय देशांच्या उर्जानिर्मितीत नैसर्गिक इंधनवायू, कच्चे तेल व कोळशाचा मोठा वाटा आहे. या तिन्ही गोष्टी युरोपिय देश रशियाकडून आयात करतात. युरोपमधील एकूण मागणीपैकी 30 टक्क्यांहून अधिक मागणी रशियाकडून पूर्ण केली जाते. युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपिय देशांनी रशियन इंधनावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली असून काही देशांनी रशियाकडून होणारी इंधनवायुची आयात बंद केली आहे. तर युरोपिय महासंघाने या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात 90 टक्क्यांनी कमी करण्याचे जाहीर केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, आयईएच्या प्रमुखांचा नवा इशारा लक्षवेधी ठरतो. फातिह बिरॉल यांनी सध्याचे संकट 1970 सालच्या संकटापेक्षा मोठे असल्याचा दावा करून पाश्‍चिमात्य देशांसमोरील चिंता अधिकच वाढविल्या आहेत. ‘रशिया हा आंतरराष्ट्रीय ऊर्जा व्यवस्थेचा कणा आहे. रशिया जागतिक स्तरावर कच्चे तेल व नैसर्गिक इंधनवायुचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. कोळसा निर्यातीतही रशिया आघाडीच्या देशांपैकी एक म्हणून ओळखण्यात येतो`, याची आठवण बिरॉल यांनी करून दिली. सध्याचे निर्बंध कायम राहिले तर युरोपिय देशांवर लवकरच इंधनाचे रेशनिंग करण्याची वेळ ओढवेल, असा इशारा बिरॉल यांनी दिला. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा कालावधी लक्षात घेता अमेरिकेतही इंधनाची टंचाई निर्माण होऊ शकते, असे बिरॉल यांनी बजावले.

दरम्यान, रशियाने डेन्मार्कला करण्यात येणारा नैसर्गिक इंधनवायुचा पुरवठा बंद केला आहे. रुबलमध्ये देणी न चुकविल्याने इंधनपुरवठा बंद केल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. यापूर्वी रशियाने पोलंड, बल्गेरिया व फिनलंडचा इंधनपुरवठाही बंद केला होता.

leave a reply