इस्रायल, सुदान अब्राहम कराराविरोधात हमास, इस्लामिक जिहादची धमकी

खार्तुम/जेरूसलेम – इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांच्या सुदान भेटीचे पडसाद पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीत उमटले आहेत. युएई, बाहरिन व मोरोक्को यांच्याप्रमाणे सुदान देखील इस्रायलसह अब्राहम करार करणार आहे. पण सुदानने उचललेले हे पाऊल सुदानी जनतेला काळीमा फासणारे असून याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमी हमास व इस्लामिक जिहाद या गाझापट्टीतील दहशतवादी संघटनांनी दिली आहे.

आफ्रिकेतील अरब देश म्हणून ओळख असलेल्या सुदानने नेहमीच स्वतंत्र पॅलेस्टाईनची बाजू उचलून धरत हमासला इस्रायलविरोधी कारवायांसाठी सहाय्य केले होते. तीन दशके सुदानवर हुकूमत गाजविणाऱ्या ओमर अल-बशीर यांच्या कारकिर्दीत सुदानने हमासच्या दहशतवादी कारवायांचे समर्थन केले होते. पण २०१९ साली झालेल्या बंडखोरीत बशीर यांची राजवट उलथल्यानंतर सुदानची इस्रायलबाबतची भूमिका नरमली होती. २०२१ सालच्या जानेवारी महिन्यात मोरोक्को या अरब-आफ्रिकी देशाप्रमाणे सुदानने देखील इस्रायलबरोबर अब्राहम करार करण्याचे संकेत दिले होते. पण काही कारणास्तव सदर सहकार्य रखडले होते.

दोन दिवसांपूर्वी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कोहेन यांनी राजधानी खार्तूमचा दौरा केल्यानंतर सुदानने येत्या वर्षअखेरीपर्यंत अब्राहम करारात सहभागी होण्याचे स्पष्ट केले. सुदानबरोबर चाड हा आफ्रिकी देश देखील इस्रायलसह अब्राहम करारात सामील होण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत.

leave a reply