भारत-फ्रान्स-युएईमधील त्रिपक्षीय धोरणात्मक सहकार्याचा कृती आराखडा जाहीर

नवी दिल्ली – युक्रेनचे युद्ध, इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या हालचाली आणि जागतिक पातळीवर इतर भूराजकीय घडमोडींना वेग आला असतानाच भारत, फ्रान्स आणि युएईमध्ये त्रिपक्षीय सहकार्य प्रस्थापित झाले आहे. तिन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी फोनवरून चर्चा केली आणि या त्रिपक्षीय धोरणात्मक सहकार्याच्या रुपरेषेबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. यानंतर संयुक्त निवेदन सादर करून तिन्ही देशांमध्ये धोरणात्मक सहकार्याचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला. संरक्षण आणि अणुऊर्जा क्षेत्रात तिन्ही देश सहकार्य अधिक भक्कम करणार असून आर्थिक, तंत्रज्ञानाच्या आघाडीवरही भागीदारी वाढविणार आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारत-फ्रान्स-युएईमध्ये पहिली त्रिपक्षीय चर्चा पार पडली होती. त्याआधी जुलै महिन्यात पहिल्यांदा या देशांनी आपण त्रिपक्षीय सहकार्य स्थापन करणार असल्याचे जाहीर केले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये जगभरात प्रचंड वेगाने भूराजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे अनेक गट तयार होत असून भारत-फ्रान्स-युएईच्या रुपात नवा त्रिपक्षीय गट गेल्या वर्षी अस्तित्त्वात आला होता.

तिन्ही देशांनी समान हितसंबंध लक्षात ठेवून हे त्रिपक्षीय सहकार्य स्थापन केले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्री कॅथरिन कॉलोना आणि युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायद अल-नह्यान यांनी शनिवारी या त्रिपक्षीय सहकार्याच्या कृती आराखड्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी व तो कार्यान्वित करण्यासाठी फोनवरून चर्चा केली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती जाहीर केली. तिन्ही देश विविध पातळ्यांवर, विविध क्षेत्रात सहकार्य भक्कम करणार आहेत.

भारत-युएई, युएई-फ्रान्स, भारत-फ्रान्स, असे द्विपक्षीय सहकार्य आधीच मजबूत आहे. आता त्रिपक्षीय सहकार्याद्वारे हे देश परस्परांमधील धोरणात्मक भागीदारी वाढवित आहेत. विशेषत: संरक्षण आणि अणुऊर्जा क्षेत्रात त्रिपक्षीय सहकार्य वाढविण्यात येणार आहे. तिन्ही देशांच्या संरक्षणदलांमध्ये विविध पातळ्यांवर सहाकार्य वाढविण्याचे निश्चित झाले आहे. तसेच तिन्ही देशांनी अन्नसुरक्षा, ‘सर्क्युलर इकोनॉमी’मध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञान, ऊर्जा आणि हवामानबदल या विषयांवरही त्रिपक्षीय सहकार्य भक्कम केले जाणार आहे.

याशिवाय भविष्यातील साथीच्या रोगांचा धोका ओळखून या क्षेत्रातही भारत-फ्रान्स-युएई एकत्रित रित्या काम करणार आहेत. कोरोनापेक्षा महाभंयकर साथी पुढील काळात येतील, असे इशारे तज्ज्ञांकडून वारंवार दिले जात आहेत. कोरोनाचा विषाणूबाबत हा जैविक युद्धाचा भाग होता, असे आरोप आधीच झाले आहेत. तसेच भविष्यात अशा जैविक युद्धाचा धोका संभवतो, असे वारंवार तज्ज्ञ सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर, भविष्यात महासाथींच्या धोक्याशी सामना करण्याकरीता सहकार्य स्थापन करण्याचा तिन्ही देशांच्या कृती आराखड्यातील निर्णय महत्त्वाचा ठरतो.

leave a reply