इस्रायल-पॅलेस्टिनींमधील संघर्ष नाजूक स्थितीत पोहोचला आहे

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या राजदूतांचा इशारा

जेरूसलेम – गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक भागात वाढत असलेला हिंसाचार गंभीर आहे. या संघर्षामुळे सदर क्षेत्रातील स्थिती नाजूक अवस्थेत पोहोचली आहे. राजनैतिक मध्यस्थीशिवाय हा संघर्ष रोखता येणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने नियुक्त केलेले राजदूत टोर वेनीसलँड यांनी दिला.

पॅलेस्टाईनच्या महमूद अब्बास यांच्या सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरातून मिळणाऱ्या पाठिंब्यात झालेली घट या बिघडत्या परिस्थितीसाठी कारणीभूत असल्याचा दावा वेनीसलँड यांनी केला. संयुक्त राष्ट्रसंघ पॅलेस्टाईनची जबाबदारी झटकू शकत नाही, असेही वेनीसलँड म्हणाले. गेल्या महिन्यात इस्रायल आणि वेस्ट बँकमध्ये झालेल्या संघर्षात ३५ पॅलेस्टिनी तर सात इस्रायलींचा बळी गेला, याकडेही राष्ट्रसंघाच्या राजदूतांनी लक्ष वेधले.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष आत्ताही थांबविता येऊ शकतो. दोन्ही गटांमधील शांतीचर्चा पूर्णपणे फिस्कटलेली नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने ठामपणे राजनैतिक मध्यस्थी केली तर हा संघर्ष रोखता येईल, असा दावा वेनीसलँड यांनी केला.

leave a reply