गोलान टेकड्यांबाबतच्या इस्रायलच्या निर्णयावर हमासचा तीव्र आक्षेप

तेहरान हमासचा तीव्र आक्षेप– गोलान टेकड्यांवरील लोकवस्ती दुप्पटीने वाढविण्याबाबत इस्रायलच्या सरकारने जाहीर केलेल्या योजनेवर गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने संताप व्यक्त केला. ‘सदर योजना म्हणजे पॅलेस्टिनी जनता व पॅलेस्टाईनच्या विरोधात आहे. हे तर अरबांची भूमी आणि अधिकारांवर नवे आक्रमण ठरते’, असा आरोप हमासचा प्रवक्ता हाझेम कासेम याने केला. काही तासांपूर्वी सिरियातील अस्साद राजवटीने इस्रायलची घोषणा चिथावणीखोर असल्याचा इशारा दिला होता.

इस्रायलच्या नियंत्रणाखाली असलेल्या गोलान टेकड्यांच्या भागात इस्रायली निर्वासितांसाठी ७,३०० घरांचे बांधकाम करण्याची घोषणा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दोन दिवसांपूर्वी केली. गोलान टेकड्यांमधील लोकसंख्या दुप्पटीने वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे बेनेट यांनी जाहीर केले होते. या योजनेमुळे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोलान टेकड्यांवरील इस्रायलचा दावा यापुढे अधिक मजबूत होईल. तसेच याद्वारे इस्रायल आपला विस्तार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे काही पाश्‍चिमात्य विश्‍लषकांचे म्हणणे आहे.

इस्रायली पंतप्रधानांच्या या घोषणेची दखल घेऊन दोन दिवसानंतर हमासने यावर प्रतिक्रिया दिली. ‘गोलान टेकड्यांवरील या योजनेमुळे पुन्हा एकदा इस्रायलची घमेंडखोर वृत्ती आणि विस्तारवादी धोरण जगासमोर आले आहे. आंतरराष्ट्रीय नियम व कायदे यांची आपल्याला पर्वा नसल्याचे इस्रायलने दाखवून दिले आहे’, अशी टीका कासेम याने केली. त्याचबरोबर ‘गोलानमध्ये वस्त्या उभारून या भूभागाचा इतिहास, वास्तव बदलणार नाही. पॅलेस्टिनींची अधिकार अबाधित असून या भागात घुसखोरी करणार्‍या इस्रायलींचे अस्तित्व यापुढे संपुष्टात येईल’, अशी धमकी हमासच्या प्रवक्त्याने दिली.

तसेच इस्रायलच्या या योजनेविरोधात जगभरातील अरब-इस्लामी देशांनी आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन हमासच्या प्रवक्त्याने केले. काही तासामपूर्वी अरब लीगने देखील इस्रायलच्या गोलान योजनेवर टीका केली होती.

leave a reply