फ्रान्स, जर्मनी व इटलीच्या राष्ट्रप्रमुखांची युक्रेनला भेट

किव्ह – रशियाविरोधातील युद्धावरून युक्रेन व पाश्चिमात्य देशांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने प्रसिद्ध होत होत्या. या पार्श्वभूमीवर युरोपातील आघाडीचे देश असलेल्या फ्रान्स, जर्मनी व इटलीच्या राष्ट्रप्रमुखांनी गुरुवारी युक्रेनची राजधानी किव्हला भेट दिली. या भेटीत युरोपिय राष्ट्रप्रमुखांनी संपूर्ण युरोप युक्रेनमागे एकजुटीने उभा असल्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी युक्रेनला युरोपिय महासंघाचे सदस्यत्व देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यास युरोपिय देश तयार असल्याचेही म्हटले आहे.

Heads-of-State-visit-Ukraineयुक्रेन युद्धाबाबत आपली भूमिका मांडताना ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांनी, तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे, असे वक्तव्य नुकतेच केले होते. त्याचवेळी रशिया-युक्रेन युद्धाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा सल्लाही दिला होता. त्यानंतर आघाडीच्या युरोपिय देशांच्या नेत्यांनी किव्हला भेट देणे लक्ष वेधून घेणारे ठरते. गुरुवारी एका विशेष रेल्वेगाडीतून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ व इटलीचे राष्ट्रप्रमुख मारिओ द्रागी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये दाखल झाले. मॅक्रॉन, शोल्झ व द्रागी यांच्याबरोबरच रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष क्लॉस लोहानिसदेखील युक्रेनमध्ये उपस्थित आहेत.

युक्रेनमध्ये दाखल झाल्यानंतर युरोपिय नेत्यांनी किव्हजवळील इरपिन या जागेला भेट दिली. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासह दीर्घकाळ चर्चा करण्यात आली. या चर्चेत युक्रेनला देण्यात येणारे शस्त्रसहाय्य, युरोपिय महासंघाचे सदस्यत्व, अर्थसहाय्य व इतर मदत आणि रशियाविरोधातील निर्बंध यासारख्या मुद्यांचा समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. चर्चेनंतर पाचही देशांची संयुक्त पत्रकार परिषदही पार पडली.

या परिषदेत फ्रान्ससह चारही युरोपिय देशांनी आपण युक्रेनच्या महासंघातील उमेदवारीचे समर्थन करीत असल्याचे जाहीर केले. युक्रेन हा युरोपियन कुटुंबाचा भाग असल्याचे जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी सांगितले. महासंघातील प्रवेशाबाबत युक्रेनच्या महत्त्वाकांक्षांना इटलीचा पाठिंबा असल्याचे पंतप्रधान द्रागी म्हणाले. तर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी युद्ध सुरू असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला ठेवणे महत्त्वाचे आहे, असे बजावल्याचे सांगण्यात येते.

leave a reply