सिरियन विमानतळावरील हल्ल्याप्रकरणी रशियाने इस्रायलच्या राजदूतांना समन्स बजावले

bennett-putinमॉस्को – सिरियातील इस्रायलच्या हवाई हल्ल्यांवर रशियाची तीव्र प्रतिक्रिया उमटली. गेल्या आठवड्यात सिरियन विमानतळावर झालेल्या हवाई हल्ल्यांसाठी रशियाने इस्रायली राजदूतांना समन्स बजावले. तसेच सिरियाला इतर कुठल्याही देशाची युद्धभूमी बनू देणार नाही, अशी घोषणा रशियाने केली. याद्वारे सिरियात हवाई हल्ले चढविणाऱ्या इस्रायलला रशियाने इशारा दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

syria-airportगेल्या आठवड्यात सिरियाची राजधानी दमास्कस येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार हवाई हल्ले झाले. सिरियन लष्करआणि सरकारी माध्यमांनी या हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी दमास्कस विमानतळावर ही कारवाई केल्याचा आरोप सिरियाने केला होता. सिरियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायली विमानांना पिटाळल्याचा दावा सिरियन माध्यमांनी केला होता.

सिरियातील ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने विमानतळावरील नुकसान दाखविणाऱ्या व्हिडिओज्‌‍ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. तर इस्रायली कंपनीने सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून विमानतळावरील धावपट्ट्यांचे झालेले नुकसान जगासमोर मांडले. यावरुन विमानतळावरील प्रवासी विमानांची ये-जा पूर्णपणे बंद झाल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता.

syria-israel-strikeपण या हल्ल्यात विमानतळाचे फारसे नुकसान झाले नसल्याचे सिरियन यंत्रणांनी म्हटले होते. तसेच गेल्या आठवड्यातील शनिवारनंतर हे विमानतळ सुरू केले जाईल, अशी घोषणा सिरियाने केली होती. पण अजूनही सदर विमानतळ सुरू झाले नसून यावरुन येथील नुकसानाची कल्पना केली जाऊ शकते, असे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, रशियाने इस्रायलचे राजदूत अलेक्झांडर बेन-झी यांना समन्स बजावले. दमास्कस विमानतळावरील हल्ल्याबाबत इस्रायलने सविस्तर खुलासा द्यावा, अशी मागणी रशियन परराष्ट्र मंत्रालयाने केली. या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाकडून सिरियासाठी मानवतावादी सहाय्य घेऊन जाणाऱ्या विमानांची सेवा बाधित झाल्याची टीका रशियाने केली. ‘इस्रायलने आत्तापर्यंत दिलेल्या सबबीने रशियाचे समाधान झालेले नाही. काही झाले तरी रशिया सिरियाला इतर देशांची युद्धभूमी बनू देणार नाही’, अशी घोषणा रशियन परराष्ट्र मंत्रालयाने केली.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांमध्ये सिरियात हवाई हल्ले चढविणाऱ्या इस्रायलला रशियाने फटकारण्याची ही दुसरी वेळ ठरते. याआधीच्या हवाई हल्ल्यात रशियाने इस्रायली विमानांविरोधात ‘एस-300′ हवाई सुरक्षा यंत्रणा देखील कार्यान्वित केली होती. त्यामुळे सिरियाप्रकरणी इस्रायल आणि रशियामध्ये वाद निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

leave a reply