भारताला हजार घावांनी रक्तबंबाळ करण्याचे पाकिस्तानचे कारस्थान

भारताला हजार घावांनी रक्तबंबाळ करण्याचे पाकिस्तानचे कारस्थान

श्रीनगर – गलवानमधील संघर्षाला दोन वर्ष पूर्ण होत असताना, देशाच्या सन्मानासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी कृतज्ञतापूर्ण स्मरण केले. त्याचे धैर्य, शौर्य आणि सर्वोच्च बलिदान याचे देशाला कधीही विस्मरण होणार नाही, असे भावपूर्ण उद्गार संरक्षणमंत्र्यांनी काढले. त्याचवेळी जम्मू आणि काश्मीरमधील आपल्या दौऱ्यात संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानवर घणाघाती टीका केली. हजार घाव घालून भारताला रक्तबंबाळ करण्याच्या कारस्थानावर पाकिस्तान अजूनही काम करीत आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी सुरक्षा दलांना संबोधित करताना बजावले आहे.

Pakistan's-plotजम्मू व काश्मीरमधील दहशतवाद्यांना ठार करून सुरक्षा दलांनी इथल्या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जम्मू व काश्मीरमध्ये अस्थैर्य माजविण्यासाठी वेगवेगळ्या कटांवर काम करीत आहेत. सुरक्षा दलांच्या जवानांवरील हल्ले हाणून पाडले जात असताना, दहशतवाद्यांनी जम्मू व काश्मीरमधल्या सर्वसामान्य जनतेला लक्ष्य करण्याचे भयंकर कारस्थान आखले. सरकारी कर्मचारी व दुसऱ्या राज्यातून इथे आलेल्या नागरिकांचा बळी घेऊन दहशतवादी संघटना आपले अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी धडपडत आहेत. या दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तानातील म्होरक्यांनी तसे आदेश दिल्याच्या बातम्या समोर येत आहे.

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 मागे घेतल्यानंतर, हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्यात पाकिस्तानला दारूण अपयश आले होते. काश्मीरबाबतचे आपण करीत असलेल्या कांगाव्याकडे कुणीही लक्ष देत नाही, हे पाहून अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना हाताशी धरून जम्मू व काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग सुरू केले. दहशतवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांवर व सरकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यामागे पाकिस्तानचे हे कारस्थान आहे. याद्वारे जम्मू व काश्मीरमध्ये असंतोष असल्याचे चित्र पाकिस्तानला उभे करायचे आहे.

याची गंभीर दखल घेऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानचा सज्जड इशारा दिला. ‘आपला शेजारी देश कायम भारतविरोधी कारवाया करीत आला आहे. हजार घाव घालून भारताला रक्तबंबाळ करण्याच्या कटावर पाकिस्तान काम करीत आहे. पण बीएसएफने देशाच्या संरक्षणासाठी भक्कम कुंपणासारखे काम केले. त्यामुळे भारतावर घाव घालण्याची तयारी करीत असलेला पाकिस्तानच आता रक्तबंबाळ झाला आहे’, असे संरक्षणमंत्री म्हणाले. साऱ्या देशाचा तुमच्यावर प्रगाढ विश्वास आहे. तुम्ही कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहात, याची विश्वासपूर्ण जाणीव देशाला आहे, अशा शब्दात संरक्षणमंत्र्यांनी बीएसएफच्या जवानांची प्रशंसा केली.

पुढच्या काळात देशाची एकात्मता व अखंडतेला धक्का देण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, तर भारत त्याला मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिल्यावाचून राहणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. दरम्यान, आपल्या या दौऱ्यात संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तान लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील सज्जतेची पाहणी केली. पाकिस्तानचे लष्कर चीनच्या लष्कराशी सहकार्य वाढविणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्या चीन दौऱ्यानंतर ही बाब समोर आली होती. एकाच वेळी दोन्ही सीमेवरील आपल्या हालचाली वाढवून भारतावर लष्करी दडपण टाकण्याच्या कारस्थानावर चीन आणि पाकिस्तान फार आधीपासून काम करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, संरक्षणमंत्र्यांनी जम्मू व काश्मीर तसेच नियंत्रण रेषेला दिलेली ही भेट आणि पाकिस्तानला दिलेल्या इशाऱ्याचे महत्त्व वाढले आहे.

leave a reply