कोकणपट्ट्यात पावसाचा जोर कायम

- दोन दिवसात 42 जणांचा बळी

मुंबई – मुंबईसह कोकण किनारपट्टी क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये सोमवारीही पावसाचा जोर कायम होता. रविवारी रात्रीही ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि मुंबईत जोरदार पाऊस झाला असून यामुळे रेल्वे व रस्ते वाहतूकीचा बोजवारा उडाला. मुंबई-गोवा महामर्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली, तसेच कोकण रेल्वेमार्गावरही गोव्यात दरड कोसळल्याने हा मार्गही विस्कळीत होता. गेल्या दोन दिवसातील पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये कोकण किनारपट्टी क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या 42 वर पोहोचली आहे.

कोकणपट्ट्यात पावसाचा जोर कायम - दोन दिवसात 42 जणांचा बळीसोमवारी मुंबईत रविवार व शनिवारी रात्रीपेक्षा पावसाचा जोर कमी असला, तरी काही भागात दमदार पाऊस झाला. तसेच दुपारनंतर मुंबईत जोरदार वारे वाहत होते. रविवारी रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कित्येक सखल भागात पाणी तुंबले होते. मुंबई शेजारील ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांमध्ये तुफानी पाऊस झाला असून या भागातही कित्येक रस्ते पाण्याखाली गेले. तसेच रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. ठाण्यातील कळव्यामध्ये तीन घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये पाच जणांचा बळी गेला. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. तसेच पालघरमध्ये तुंबलेल्या पाण्यात उघड्या गटाराचा अंदाज न आल्याने एक चार वर्षाची मुलगी वाहून गेली. तसेच रायगडमध्येही तिघे जण वाहून गेल्याचे वृत्त आहे. याआधीर रविवारी मुंबईत दरड व भिंत कोसळण्याच्या घटनांमध्ये 33 जणांचा बळी गेला होता.कोकणपट्ट्यात पावसाचा जोर कायम - दोन दिवसात 42 जणांचा बळी

तसेच तुफानी पाऊस होत असताना पर्यटकांचा उत्साह पहायला मिळाला. कोरोनाचे नियम धाब्यावर बसून नवी मुंबईतील खारघर येथील डोंगरावर गेलेल्या सुमारे दीडशे जण येथील ओढ्याचे पाणी वाढल्याने अडकले होते. यामध्ये लहान मुले व महिलांचाही समावेश होते. अग्नीशामकदलाच्या जवानांना याबाबतची सूचना मिळाल्यावर अतिशय जोखीम पत्करुन या सर्वांची सुटका केली. हवामानखात्याच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टी क्षेत्रात अजूनही जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे रेड अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय बैठकही सोमवारी पार पडली व आपत्कालिन तयारीचा आढावा घेण्यात आला.

leave a reply