२१ हजार कोटी रुपयांचे हेरॉईन गुजरातमधील बंदरावरून जप्त

• विजयवाडा येथील कंपनीने याआधी ७२ हजार कोटींचे हेरॉईन तस्करी केल्याची आशंका • दिल्ली, गुजरात आणि आंध्र प्रदेशात धाडसत्र

अहमदाबाद/विजयवाडा – टॅल्कम खड्यांच्या नावाखाली अफगाणिस्तानातून भारतात होत असलेल्या अमली पदार्थाच्या आयातीचा मोठा भांडाफोड झाला आहे. गुजरातच्या कच्छमधील मुंद्रा पोर्टमध्ये एका इराणी जहजातून उतरविण्यात आलेल्या कंटेनर्समधून तब्बल २१ हजार कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. भारतात एकाचवेळी पहिल्यांदा अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशमधील ज्या कंपनीने अफगाणिस्तानातून टॅल्कम पावडरच्या खड्यांची आयात केली, या कंपनीने याआधी सुमारे ७२ हजार कोटींची अशीच आयात केली आहे. त्यामुळे या कंपनीने जुलैपर्यंत अशाच पद्धतीने टॅल्कम पावडरच्या नावाखाली ७२ हजार कोटींचे हेरॉईन तस्करी करून भारतात इतर शहरांमध्ये पोहोचविल्याची आशंका व्यक्त केली जात आहे. २१ हजार कोटी रुपयांचे हेरॉईन गुजरातमधील बंदरावरून जप्तअफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यावर भारतात अमली पदार्थांची तस्करी व दहशतवाद वाढेल, अशी भीती तज्ज्ञ वर्तवित होते. या पार्श्‍वभूमीवर मुंद्रा पोर्टमध्ये इतका प्रचंड मोठा साठा पकडला गेला आहे. गुजरातच्या डायरेक्टर रिव्हेन्यु ऑफ इंटिलिजन्सने (डीआरआय) मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंद्रा पोर्टमध्ये छापा टाकून येथे उतरलेल्या काही संशयीत कंटेनरची तपासणी केली. यातील दोन कंटेनरमधून सुमारे ३ हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो हेरॉइनची किंमती सात कोटी रुपये इतकी असून यानुसार २१ हजार कोटी रुपयांची हेरॉईन तस्करी डीआरआयने पकडली आहे. या कंटेनरमधून अफगाणिस्तानच्या कंदहारस्थित हसन हुसेन लिमिटेडने टॅल्कम खड्यांची निर्यात केली होती. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका कंपनीने हा माल आयात केला होता. या मालाची तपासणी करण्यात आली, त्यावेळी टॅल्कम पावडरच्या आडून हॅरॉईनची तस्करी सुरू होती, असे स्पष्ट झाले आहे. १६ आणि १७ सप्टेंबरला ही कारवाई झाली असून एका कंटेनरमधून सुमारे दोन हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले, तर दुसर्‍या कंटेनरमधून ९८८ किलो हेरॉईन डीआरआयच्या अधिकार्‍यांनी हस्तगत केल्याची माहिती मिळत आहे. यानंतर गेल्या तीन दिवसांमध्ये तपास यंत्रणांनी दिल्ली, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये धाडी टाकल्याचे वृत्त आहे. काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी ग्रेटर नोएडामधून २२ किलो हेरॉईनसह दोन अफगाणी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान आणि देशविरोधी शक्ती अफगाणिस्तानातून भारतात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी करून याद्वारे टेरर फंडिंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी याआधी वारंवार दिला आहे. २१ हजार कोटी रुपयांचे हेरॉईन गुजरातमधील बंदरावरून जप्ततर तपास यंत्रणांच्या तपासातही ही बाब वारंवार स्पष्ट झाली आहे. भारतात होत असलेल्या अमली पदार्थ तस्करीमागे पाकिस्तानचा हातही वारंवार उघड झाला आहे. २०१९ च्या जुलै महिन्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अफगाणिस्तान-पाकिस्तान ड्रग्ज माफियांचे पाच हजार कोटींचे अमली पदार्थ तस्करीचे एक रॅकेट उद्ध्वस्त केले होते. दिल्लीतील छाप्यात ६०० कोटी रुपयांचे हेरॉईनही जप्त करण्यात आले होते. या तस्करीचे धागेदोरे जम्मू-काश्मीर व पंजाबपर्यंत पोहोचले होते. तीनच महिन्यांपूर्वी मुंबईतील जेएनपीटी बंदरातही टॅल्कम पावडरच्या आयातीच्या नावाखाली तस्करी करण्यात आलेले ८७९ कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. तसेच हे हेरॉईन रस्ते मार्गाने पंजाबमध्ये पाठविण्यात येणार होते. गेल्या दोन वर्षात भारतात पंजाबमध्ये सर्वात जास्त अमली पदार्थांची तस्करी झाल्याचे दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात अधोरेखित करण्यात आाले होते. दरम्यान, मुंद्रा पोर्टमध्ये पकडण्यात आलेला हेरॉइनचा साठा आतापर्यंत एकाच कारवाईत पकडण्यात आलेला सर्वात मोठा साठा आहे. याआधी २०१७ सालात गुजरातच्या भावनगरजवळ तटरक्षकदलांनी एका जहाजातून पाच हजार कोटींचे हेरॉईन जप्त केले होते. तसेच २०२० च्या नोव्हेंबरपासून अरबी समुद्र क्षेत्रात नौदल व तटरक्षकदलाने केलेल्या निरनिराळ्या कारवाईत सुमारे आठ हजाराहून अधिक कोटींची अमली पदार्थ तस्करी पकडण्यात आली आहे. मार्च महिन्यात लक्षद्विपजवळ एका जहाजातून दोन हजार कोटींच्या हेरॉईनसह पाच एके-४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या होत्या.

leave a reply