पंतप्रधानांच्या अमेरिका दौर्‍यामुळे पाकिस्तान व चीनच्या चिंता वाढल्या

पाकिस्तान व चीननवी दिल्ली – अफगाणिस्तानातील उलथापालथी आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यासाठी निघाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबरील पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चेकडे जगभरातील प्रमुख देशांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यानंतर क्वाडची बैठक पार पडणार असून यावर चीनने आक्षेप घेतला आहे. तर भारतीय पंतप्रधानांच्या या अमेरिका दौर्‍याचे भयंकर परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागतील, अशी चिंता पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करू लागली आहेत.

२४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडेल. यावेळी दहशतवादाच्या आव्हानावर मात करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय केला जाईल, अशी माहिती भारताचे परराष्ट्रसचिव हर्ष वर्धन श्रिंगला यांनी दिली. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. कारण अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर, दहशतवादाचा धोका अधिकच बळावल्याची चिंता आता जगभरातील प्रमुख देश व्यक्त करू लागले आहेत. अमेरिकेचे आजी व माजी लष्करी अधिकारी, मुत्सद्दीवर्ग तसेच विश्‍लेषक देखील तालिबानच्या अफगाणिस्तानवरील ताब्यानंतर हा देश दहशतवाद्यांचे केंद्र बनत असल्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील चर्चेत दहशतवाद हा प्रमुख मुद्दा असल्याचे जाहीर करून भारताच्या परराष्ट्रसचिवांनी पाकिस्तानची धडधड वाढविली आहे.

अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ले चढविण्यासाठी अमेरिका भारताच्या हवाई हद्दीचा वापर करू शकेल, असे संकेत देऊन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी यासंदर्भात भारताशी चर्चा सुरू असल्याचे जाहीर केले होते. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता यावी, यासाठी आपला प्रभाव वापरणार्‍या पाकिस्तानला यामुळे मोठा धक्का बसला. अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांबरोबरच अमेरिका व भारत पाकिस्तानातील दहशतवाद्यांनाही लक्ष्य करतील, अशी चिंता पाकिस्तानचे विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. अमेरिका पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी भारताचा वापर करील व भारतामार्फत अमेरिका पाकिस्तानवर हल्ले चढविल, अशी भीती काही पाकिस्तानी पत्रकार व्यक्त करीत आहेत.

इतकेच नाही तर भारत व अमेरिका मिळून अफगाणिस्तानातील परिस्थितीचे खापर पाकिस्तानवर फोडून आर्थिक पातळीवर पाकिस्तानची नाकेबंदी करणारे निर्णयही घेऊ शकतात, याचीही चर्चा पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये सुरू आहे. चीनसारखा देश देखील भारतीय पंतप्रधानांच्या अमेरिका दौर्‍यामुळे अस्वस्थ झाल्याने पाकिस्तानवरील दडपणात अधिकच वाढ झाल्याचे दिसते आहे. पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील द्विपक्षीय चर्चा व त्यानंतर होणारी क्वाडची बैठक याची गंभीर दखल चीनने घेतली आहे. एकेकाळी क्वाडचे सहकार्य कधीही प्रत्यक्षात उतरू शकणार नाही, असे दावे करून त्याची खिल्ली उडविणार्‍या चीनला आता मात्र क्वाडच्या सहकार्याची धास्ती वाटू लागली आहे.

क्वाड म्हणजे आशियाई नाटो असून ही शीतयुद्धाच्या काळातील मानसिकतेतून जन्माला आलेली संघटना असल्याची टीका चीन करू लागला आहे. इतके नाही तर रशियामार्फत दबाव टाकून चीन भारताने क्वाडशी सहकार्य करू नये, यासाठी धडपडत असल्याची बाब याआधी समोर आली होती.

leave a reply