हिजबुल्लाहने युद्ध पुकारले तर इस्रायलच्या प्रत्युत्तराने लेबेनॉन हादरेल

- इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

जेरूसलेम/बैरूत – ‘इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या विरोधात युद्ध पुकारले, तर यामध्ये हिजबुल्लाहला जबर हानी सोसावी लागेल. इस्रायलच्या प्रत्युत्तराने लेबेनॉन देखील हादरून जाईल’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. मेजर जनरल कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराण सक्षम असल्याची घोषणा हिजबुल्लाहचे नेते महिन्याभरापूर्वीपर्यंत करीत होते. पण गेल्या काही दिवसांपासून हिजबुल्लाहने इस्रायलची शहरे नष्ट करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. यावर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला इस्रायलच्या हवाईदलाने उत्तरेकडील भागात अघोषित युद्धसरावाचे आयोजन केले होते. तीन दिवसांच्या या युद्धसरावात इस्रायलच्या लढाऊ, बॉम्बर्स विमाने तसेच ड्रोन्स व हेलिकॉप्टर्सनी प्रतिदिन तीन हजार लक्ष्य भेदण्याचा सराव केला होता. २००६ साली हिजबुल्लाहबरोबरच्या युद्धात इस्रायली हवाईदलाने लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या पाच हजार ठिकाणांना लक्ष्य केले होते. या पार्श्‍वभूमीवर सदर युद्धसराव म्हणजे इस्रायलची हिजबुल्लाहवर नव्या हल्ल्याची तयारी असल्याचे बोलले जाते.

इस्रायलच्या या युद्धसरावावर हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाने टीका केली होती. इस्रायल या युद्धसरावाद्वारे हिजबुल्लाहवर हल्ल्याची तयारी करीत असल्याचा आरोप नसरल्लाने केला होता. ‘हिजबुल्लाहला इस्रायलविरोधात युद्ध छेडायचे नाही. पण इस्रायलने युद्ध पुकारले तर आत्तापर्यंत अनुभवलेले नाही असे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील’, अशी धमकी नसरल्लाने दिली होती. त्याचबरोबर, इस्रायलची शहरे, गावे आणि लष्कराची ठिकाणी हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यात जमीनदोस्त करण्यात येईल, असा इशारा नसरल्लाने दिला होता.

हिजबुल्लाह प्रमुखाच्या या धमकीला इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी प्रत्युत्तर दिले. ‘इस्रायल आखातातील सर्वात सामर्थ्याशाली लष्कर आहे. तरीही काही संघटना इस्रायलला धमकावण्याची चूक करतात. पण या दहशतवादी संघटनांनी विशेषत: हिजबुल्लाह व हमासने इस्रायलविरोधात युद्ध पुकारले तर इस्रायलचे नाही तर या संघटनांचे जबर नुकसान होईल. इस्रायलच्या कारवाईने लेबेनॉन देखील हादरून जाईल’, असा इशारा गांत्झ यांनी दिला. येत्या काळात हिजबुल्लाह इस्रायलविरोधात अल्प काळासाठीचे युद्ध पुकारू शकतो, अशी शक्यता इस्रायली लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने काही दिवसांपूर्वीच वर्तविली होती.

हिजबुल्लाह लेबेनॉनमध्ये राजकीय प्रभाव असलेली संघटना आहे. या संघटनेला इराणकडून रॉकेट्स, क्षेपणास्त्रे तसेच इतर शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जातो. हिजबुल्लाहकडे किमान ४० हजार ते दीड लाख रॉकेट्स असल्याचा दावा केला जातो. या व्यतिरिक्त रणगाडाभेदी, विमानभेदी आणि युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रे असल्याची माहिती समोर आली होती. तर सिरियातील संघर्षात हिजबुल्लाहने टी-५५ आणि ‘टी-७२’ रणगाड्यांचा वापर केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

leave a reply