इस्रायल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे भेदणारी ‘अ‍ॅरो ४’ यंत्रणा विकसित करणार

जेरूसलेम – इस्रायलने अमेरिकेला हाताशी घेऊन ‘अ‍ॅरो ४’ ही अँटी-बॅलेस्टिक हवाई सुरक्षा यंत्रणा विकसित करण्यास सुरुवात केली आहे. विलक्षण वेग आणि भेदक क्षमता असलेल्या ‘अ‍ॅरो ४’मुळे इस्रायलची हवाई सुरक्षा अधिक मजबूत होईल, असा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने केला. दरम्यान, आत्मविश्‍वास दुणावलेला इराण येत्या काळात इस्रायलवर हल्ले चढवू शकतो. यासाठी इराण इराकमध्ये किमान २०० क्षेपणास्त्रे तैनात करील, असा इशारा इस्रायली वर्तमानपत्राने काही दिवसांपूर्वीच दिला होता.

लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटना आणि गाझापट्टीतील हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी इस्रायल घेरलेला आहे. हजारो रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या या दहशतवादी संघटना कुठल्याही क्षणी इस्रायलवर हल्ले चढवतात. यामुळे इस्रायलने आपल्या सुरक्षेसाठी स्वदेशी बनावटीची ‘आयर्न डोम’, ‘डेव्हिड्स स्लिंग’ तसेच ‘अ‍ॅरो’ अशा हवाई सुरक्षा यंत्रणा विकसित केल्या आहेत.

यापैकी आयर्न डोमचा वापर हमास व इस्लामिक जिहादच्या लघु पल्ल्याच्या रॉकेट्ससाठी केला जातो. तर हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणार्‍या मध्यम पल्ल्याच्या कत्युक्षा रॉकेट्ससाठी इस्रायलने डेव्हिड्स स्लिंग यंत्रणा लेबेनॉन तसेच सिरियाच्या सीमेजवळ तैनात केली आहे. या व्यतिरिक्त ‘अ‍ॅरो २’ आणि ‘अ‍ॅरो ३’ ही यंत्रणा इराणच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना उत्तर देण्यासाठी विकसित केली आहे. यापैकी ‘अ‍ॅरो २’ला सेवेतून बाद करून त्याच्या जागी ‘अ‍ॅरो ४’ तैनात करण्याची इस्रायलच्या लष्कराची योजना आहे.

इराणची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे भेदण्याची क्षमता ‘अ‍ॅरो ४’मध्ये असेल, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. सदर यंत्रणा वेगाने विकसित करण्यासाठी इस्रायलने अमेरिकेचे सहाय्य घेतले असून सदर यंत्रणेची निर्मिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी झेप ठरेल, असा दावा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केला. ‘अ‍ॅरो ४’मुळे इस्रायल नेहमीच आपल्या शत्रूच्या एक पाऊल पुढे असेल, असे इस्रायलच्या क्षेपणास्त्र सुरक्षा संघटनेचे प्रमुख मोशे पटेल यांनी स्पष्ट केले. तर ‘अ‍ॅरो ४’च्या विकासात सहभागी होऊन इस्रायलच्या सुरक्षेसंबंधी अमेरिका वचनबद्ध असल्याचे दाखवून दिल्याची प्रतिक्रिया अमेरिकेच्या मिसाईल डिफेन्स एजन्सीचे संचालक वाईस अ‍ॅडमिरल जॉन हिल यांनी दिली.

इस्रायल आणि अमेरिकेने ‘अ‍ॅरो ४’बाबतची घोषणा करण्याच्या दोन दिवस आधी इराण इस्रायलवर हल्ल्याची तयारी करीत असल्याची बातमी इस्रायलच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली. यासाठी इराण इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना चिथावणी देऊ शकतो. इराण लांब पल्ल्याची किमान २०० बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैनात करील, असा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला. इराकमधील कबैत हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागण्याची धमकी काही आठवड्यांपूर्वी दिली होती. तर काही दिवसांपूर्वीच इराणने दिर्घ पल्ल्याच्या स्मार्ट बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती.

leave a reply