हिजबुल्लाहच्या नेत्यांकडून इस्रायलला युद्धाच्या धमक्या

जेरूसलेम/बैरूत – इस्रायल आणि हमासमधील 11 दिवसांचा संघर्ष थांबून महिनाही लोटलेला नाही. तोच लेबेनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न झाला. यावर प्रतिक्रिया देताना इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी, हमासबरोबरचा संघर्ष म्हणजे हिमनगाचे शिखर होते, याची लेबेनॉनला जाणीव करून दिली. यावर हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्याने येत्या काळात युद्ध भडकले तर इस्रायलला नरकाच्या आगीत ढकलून देण्याची धमकी दिली. तर जेरूसलेममधील इस्रायलची लष्करी कारवाई क्षेत्रीय युद्ध भडकवू शकते, असा इशारा हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने दिला.

हिजबुल्लाहच्या नेत्यांकडून इस्रायलला युद्धाच्या धमक्यादोन दिवसांपूर्वी लेबेनॉनच्या सीमेतून दोघांनी इस्रायलच्या सीमेत घुसखोरी केली होती. यामुळे किमान दोन तास इस्रायलच्या उत्तर सीमाभागात अलर्ट जारी करण्यात आला होता. या दोघांना अटक केल्यानंतर त्यांना लेबेनीज लष्कराच्या हवाली सोपविण्यात आले. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी लेबेनॉनमधून होणार्‍या या घुसखोरीवर टीका केली. तसेच हमासप्रमाणे लेबेनीज जनतेची मानवी ढाल वापरणार्‍या हिजबुल्लाह व हिजबुल्लाहचे समर्थन करणार्‍या लेबेनॉनच्या नेतृत्वाला गांत्झ यांनी बजावले.

‘काही आठवड्यांपूर्वी गाझापट्टीने जे काही अनुभवले ते हिमनगाचे टोक होते, हे लेबेनॉनने ध्यानात ठेवावे. कारण इस्रायल आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी कायम सज्ज असतो. जर लेबेनॉनबरोबर संघर्ष भडकला तर लेबेनॉनला अफाट हानीची यातना सहन करावी लागेल, इतक्या प्रमाणात इस्रायल आपल्या लष्करी ताकदीचा वापर करील’, असा इशारा गांत्झ यांनी दिला. यावर लेबेनॉनमधील हिजबुल्लाहचा वरिष्ठ अधिकारी हसन बघदादी याने इस्रायलला धमकावले.

हिजबुल्लाहच्या नेत्यांकडून इस्रायलला युद्धाच्या धमक्या‘येत्या काळात इस्रायलने हिजबुल्लाहबरोबर युद्ध पुकारण्याची चूक केली तर इस्रायलला नरकाची आग सहन करावी लागेल. इस्रायलने धडा घेऊन वास्तविक राजकारण जाणून न घेता, वेळीच सुधारणा केल्या नाही तर इस्रायलचेच भीषण नुकसान होईल’, अशी धमकी बघदादीने दिली. तर या संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाने इस्रायलबरोबरच्या यापुढील युद्धात येमेनमधील हौथी या संघटनेचे सहाय्य घेऊन इस्रायलवर हल्ले चढविले जातील, अशी घोषणा केली. इस्रायलने जेरूसलेमच्या मर्यादा ओलांडल्या तर क्षेत्रीय युद्धाचा भडका उडून इस्रायलवर लेबेनॉन तसेच येमेन, गाझा व सिरियातून हल्ले होतील, असे नसरल्लाने धमकावले.

दरम्यान, गेल्या महिन्यात इस्रायल आणि हमासमध्ये भडकलेल्या संघर्षाचा कट मागच्या वर्षीच आणखण्यात आला होता. तर हमास, हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांबरोबर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी बैरूतमध्ये ‘वॉर रूम’ तयार करून या संघर्षाची पाहणी केल्याचेही समोर आले होते. त्यामुळे नसरल्ला याने इस्रायलला दिलेल्या धमकीचे गांभीर्य वाढल्याचे दिसत आहे.

leave a reply