तुर्की व युएईमध्ये पाच अब्ज डॉलर्सची ‘करन्सी स्वॅप डील’

‘करन्सी स्वॅप डील’इस्तंबूल/दुबई – स्थानिक चलन लिराच्या मूल्यात होणारी घसरण व परकीय गंगाजळीला लागलेली गळती रोखण्यासाठी तुर्कीने युएईबरोबर पाच अब्ज डॉलर्सच्या ‘करन्सी स्वॅप डील’वर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. हा करार तीन वर्षांसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. परकीय गंगाजळीला लागणारी गळती रोखण्यासाठी तुर्कीकडून करण्यात आलेले हे चौथे ‘करन्सी स्वॅप डील’ आहे. बुधवारी दोन देशांच्या मध्यवर्ती बँकांदरम्यान करार झाल्याचे माध्यमांकडून सांगण्यात आले.

गेले दशकभर तुर्की व युएईच्या संबंधांमध्ये जबरदस्त तणाव होता. मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद यांनी तुर्कीचा दौरा केल्यावर हा तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद यांच्या तुर्की दौर्‍यात जवळपास १० करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. युएईने तुर्कीत १० अब्ज डॉलर्सची थेट गुंतवणूक करण्याचेही संकेत दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नवा करार महत्त्वाचा ठरतो. नव्या करारामुळे युएईला तुर्कीत थेट अमेरिकी डॉलर्समध्ये गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.

युएईबरोबरील ‘करन्सी स्वॅप डील’ हा तुर्कीने चलन हस्तांतरणासंदर्भात केलेला चौथा करार ठरला आहे. यापूर्वी तुर्कीने कतार, चीन व दक्षिण कोरियाबरोबर ‘करन्सी स्वॅप डील्स’वर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. कतारबरोबर १५ अब्ज डॉलर्स, चीनबरोबर सहा अब्ज डॉलर्स तर दक्षिण कोरियाबरोबरील करार दोन अब्ज डॉलर्सचा आहे.

‘करन्सी स्वॅप डील’गेल्या वर्षभरात तुर्कीचे चलन लिराचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी घसरले आहे. एकट्या डिसेंबर महिन्यात लिराची घसरण रोखण्यासाठी तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेला पाचवेळा हस्तक्षेप करावा लागला होता. या हस्तक्षेपाच्या प्रक्रियेत मध्यवर्ती बँकेेने सहा ते १० अब्ज डॉलर्सची विक्री केली असावी, असे सांगण्यात येते. या विक्रीनंतर तुर्कीतील परकीय गंगाजळी मोठ्या प्रमाणात खाली घसरली आहे.

‘करन्सी स्वॅप डिल्स’च्या माध्यमातून तुर्की आपली परकीय गंगाजळी तात्पुरत्या काळासाठी सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. मात्र हे करार तुर्की अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालिन स्थैर्यासाठी फारसे उपयुक्त ठरणार नाहीत, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येतो.

leave a reply