भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली – भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबिर सिंग, वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस भदौरिया यांची बैठक पार पडली. यात लडाखच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. तसेच लडाखमधील चीनच्या सैन्यमाघारीवर चर्चा पार पडल्याची माहिती समोर येत आहे.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठकलडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील माघारीच्या मुद्यावर भारत आणि चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चा कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय पार पडली आहे. त्याबरोबर लडाखच्या सीमेवरील सैनिकांच्या तैनातीचा मुद्दा देखील दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. चीन सैन्य माघार घेण्यासाठी तयार झाला असला तरी त्या देशावर विश्वास ठेवता येणार नाही. म्हणूनच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षेतेखाली ही उच्चस्तरीय महत्त्वाची बैठक पार पडली.

यावेळी लडाखच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. तसेच भारत-चीन सैन्यमाघारीवर यावेळी चर्चा पार पडली. तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील चीनच्या लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीकडे पाहिले जाते. या बैठकीचे संपूर्ण तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत. दोनच दिवसांपूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लडाख सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरुन सैन्य माघारी घेण्याच्या मुद्द्यावर एकमत झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर पार पडलेली ही बैठक लक्ष वेधून घेणारी ठरते. त्याचवेळी राजधानी दिल्लीत लष्कराच्या कमांडर्सची देखील बैठक पार पडली. यावेळी चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील सुरक्षा आणि युद्धसज्जतेचा आढावा घेण्यात आला.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठकविश्वासघातकी चीनने लडाखच्या गलवान व्हॅलीत २० भारतीय जवानांना शहीद केल्यानंतर, उभय देशांमधला तणाव वाढला होता. त्यांनतर चीनने लडाखमधली सैन्यतैनाती वाढवून त्या ठिकाणी मुक्काम ठोकला होता. भारतानेही आपल्या सैन्याची कुमक मोठ्या प्रमाणावर वाढवून लढाऊ विमाने आणि रणगाडे तैनात केले होते. या सैन्यमाघारीवरुन उभय देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये पाच वेळा बैठक पार पडली. पण पाचही वेळा चर्चा अयशस्वी ठरली. अगदी दोन दिवसांपूर्वी देखील भारत आणि चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये बैठक पार पडली होती. त्यानंतर सैन्यमाघारीवरुन उभय देशांमध्ये एकमत झाल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालय आणि संरक्षणदलाच्या अधिकार्‍यांची बैठक पार पडली.

दरम्यान, ही बैठक पार पडत असतानाच चीनने कैलास-मानसरोवरमध्ये आपल्या हालचाली वाढविल्याचे समोर आले आहे. चीनने कैलास-मानसरोवर भागात जमिनीवरुन आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. तसेच या भागात चिनी सैन्याची जमवाजमव केली आहे. सॅटेलाईट फोटोग्राफ्सवरुन हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी चीनने भारत-नेपाळ सीमेवरील ‘लिपुलेख’जवळ लष्करी तैनाती वाढविण्यास सुरुवात केली होती.

leave a reply