जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा ‘आयएस’चा कट उधळला

श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात लष्करी तळावर हल्ला करण्याचा ‘आयएस’च्या दहशतवाद्यांचा कट जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून दारूगोळा व ‘आयएसजेके’चा झेंडाही जप्त केला आहे. हे दहशतवादी ‘इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू ॲण्ड काश्मीर’चे (आयएसजेके) सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘आयएसजेके’ ही ‘आयएस’ची काश्मीरमधील संघटना आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा 'आयएस'चा कट उधळलाबांदीपोरा जिल्ह्यातील पोलिसांना लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला करणार असल्याची खबर सूत्रांकडून मिळाली होती. हे दहशतवादी गेल्या काही दिवसांपासून लष्करी तळाच्या परिसरात टेहळणी करीत होते. पोलिसांनी शोध मोहीम राबवित या दहशतवाद्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये चार जण बांदीपोरा जिल्ह्यातील विविध भागात राहणारे आहेत तर एकजण श्रीनगरचा आहे. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून मॅट्रिक्स शीट, ‘आयएसजेके’चे झेंडे आणि दारूगोळा जप्त केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा 'आयएस'चा कट उधळलाहे दहशतवादी काश्मीर खोऱ्यातील तरूणांना ‘आयएसजेके’मध्ये सामील करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. तसेच चित्तीबांदि व अरगममध्ये ‘आयएसजेके’चे झेंडे तयार करून काश्मीरमधील विविध भागांमध्ये पाठवीत असल्याचे समोर आपले आहे. पोलिसांनी अरगम पोलिस ठाण्यात बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शुक्रवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या स्पेशल युनिटने ‘आयएस’च्या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर अवघ्या २४ तासांत आयएसने रचलेला दहशतवादी हल्ल्याचा हा दुसरा कट सुरक्षायंत्रणाकडून उधळण्यात आहे. त्यामुळे ‘आयएस’ भारतात सक्रिय होण्याचे प्रयत्न करीत असल्याचा दाव्यांना दुजोरा मिळाला आहे.

गेल्या वर्षी काश्मीरच्या शोपियनमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत इशफाक अहमद सोफी हा ‘आयएसजेके’चा कमांडर ठार झाला होता. यानंतर आयएसने भारतात ‘विलायत-अल-हिंद’ स्थापित करण्याची घोषणा करीत आपला प्रभाव वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्यावर्षी हिज्बुल मुजाहिद्दीन या पाकिस्तानी दहशतवादी गटाने ‘आयएसजेके’च्या दहशतवाद्याला ठार केले होते. त्यानंतर आयएसजेकेने काश्मीरमधील पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या विरोधात फतवाही जारी केला होता.

leave a reply