‘हॉर्न ऑफ आफ्रिका’मधील 68 लाख मुलांवर उपासमारीचे संकट

-‘ॲक्शन अगेन्स्ट हंगर'चा इशारा

पॅरिस – आफ्रिकेच्या पूर्व भागातील ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या देशांमधील 68 लाख मुलांवर तीव्र उपासमारीचे संकट ओढवल्याचा इशारा ‘ॲक्शन अगेन्स्ट हंगर’ या स्वयंसेवी गटाने दिला आहे. एकट्या सोमालियामध्ये उपासमारीचे संकट ओढविलेल्या मुलांच्या संख्येत 55 टक्क्यांची भर पडल्याची माहिती या गटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली. ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ क्षेत्रातील देशांमध्ये पडलेला भयावह दुष्काळ, गृहयुद्ध व अन्नधान्याच्या भडकलेल्या किंमती यामुळे उपासमारी व अन्नधान्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे, असे ‘ॲक्शन अगेन्स्ट हंगर’ने बजावले आहे.

Hungerफ्रान्समध्ये मुख्यालय असलेल्या ‘ॲक्शन अगेन्स्ट हंगर’ने एप्रिल व मे अशा सलग दोन महिन्यात ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’मधील विदारक स्थितीविषयी अहवाल प्रसिद्ध करून परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’मध्ये सोमालिया, केनिया व इथिओपिया या देशांचा समावेश होतो. आफ्रिकेतील या तिन्ही देशांमध्ये गेले तीन वर्षे पुरेसा पाऊस झालेला नाही. या देशांमध्ये 1980च्या दशकानंतरचा सर्वाधिक तीव्रतेचा कोरडा दुष्काळ पडला आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत संपले असून जमिनींना भेगा पडल्या आहेत.

शेतीचे हंगाम वाया गेल्याने अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून लाखो कुटुंबांवर उपासमारी व कुपोषणाची वेळ ओढवली आहे. त्यातच रशिया व युक्रेनमध्ये भडकलेल्या युद्धामुळे अन्नधान्याचा पुरवठा बाधित झाला असून त्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. अन्नधान्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अन्नधान्याबरोबरच इंधनाचे दरही भडकले आहेत. त्यामुळे अन्नधान्य, पाणी व इतर जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी आवश्यक असलेला वाहतुकीचाही खर्चही वाढला आहे.

Hunger-1वाढती उपासमारी व अन्नटंचाईचे भीषण परिणाम ‘हॉर्न ऑफ आफ्रिके’तील देशांवर होऊ शकतात. उपासमारी व अन्नटंचाई रोखण्यासाठी आवश्यक असलेला निधीअथवा औषधे आमच्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, असे ‘ॲक्शन अगेन्स्ट हंगर’चे सोमालियातील प्रमुख अधिकारी अहमद खालिफ यांनी सांगितले. सोमालियाला आवश्यक असणाऱ्या मानवतावादी सहाय्यापैकी फक्त 15 टक्के सहाय्य यावर्षी उपलब्ध झाले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

काही महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ भागातील भयावह दुष्काळासह अन्नटंचाई व उपासमारीच्या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार, सोमालिया, केनिया व इथिओपियातील एक कोटी, 30 लाखांहून अधिक नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल तर हॉर्न ऑफ आफ्रिकामधील तीन देशांसह इरिट्रिआमधील जवळपास दोन कोटी नागरिकांना पुढील सहा महिने अन्न व पाण्याचा पुरवठा करावा लागेल. त्यात अपयश आले तर या भागातील सुमारे 14 लाख मुले कुपोषणामुळे बळी पडतील, अशी भीती अहवालात व्यक्त करण्यात आली होती.

leave a reply