जगभरातील ज्यू, इस्रायलींवर हल्ल्याची योजना आखणारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍चा अधिकारी ठार

-इस्रायलच्या मोसादवर इराणचा आरोप

जेरुसलेम – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍चे वरिष्ठ अधिकारी कर्नल हसन सय्यद खोदयारी यांची राजधानी तेहरानमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जगभरातील ज्यूधर्मीय आणि इस्रायलींच्या अपहरणाची व हत्येची योजना खोदयारी यांनी आखली होती. त्यामुळे इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने खोदयारी यांची हत्या घडविल्याचा आरोप इराणची माध्यमे करीत आहे.

attacks on Jewsदरम्यान, कर्नल खोदयारी हे इराणच्या कुद्स फोर्सेसचे माजी प्रमुख कासिम सुलेमानी यांचा उजवा हात म्हणून ओळखले जात होते. रविवारी दुपारी राहत्या घराच्या आवारात गाडी पार्क करत असताना कर्नल खोदयारी यांच्यावर हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी हा हल्ला चढविल्याचे इराणी यंत्रणांनी म्हटले आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अहंकाराने भरलेल्या गुन्हेगारी आणि जागतिक दहशतवादी गटांनी हा हल्ला चढविल्याचा आरोप इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍ने केला आहे.

याआधी अमेरिका आणि इस्रायलवर आरोप करण्यासाठी रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍ने अशा वाक्यांचा वापर केला होता. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍ इस्रायलला जबाबदार धरत आहेत. तर कर्नल खोदयारी यांची हत्या घडवून इराणच्या शत्रूंनी रेड लाइन ओलांडली आहे. या एका हत्येमुळे सारी समीकरणे बदलली असून हल्लेखोरांना याची जबर किंमत चुकवावी लागेल, असा इशारा इराणची माध्यमे देत आहेत.

khodaiepa_Pratyakshaरिव्होल्युशनरी गार्डस्‌‍शी संबंधित असलेली माध्यमे उघडपणे या हल्ल्यासाठी मोसादला जबाबदार धरत आहेत. खोदयारी हे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍मधील कुद्स फोर्सेसचे वरिष्ठ अधिकारी होते. 2020 साली अमेरिकेने इराकमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेले कासिम सुलेमानी यांचे विश्वस्त आणि उजवा हात म्हणून खोदयारी यांना ओळखले जात होते. त्यामुळे खोदयारी यांची हत्या कुद्स फोर्सेसच्या कारवायांना हादरा देणारी ठरते.

गेल्या काही दिवसांपासून सायप्रस, तुर्की तसेच पाश्चिमात्य देशांमध्ये राहणारे ज्यूधर्मीय आणि इस्रायली नागरिकांचे अपहरण करून त्यांची हत्या घडविण्याचे कट समोर येत आहेत. सायप्रस आणि तुर्कीमध्ये हल्लेखोरांना ताब्यातही घेण्यात आले होते. या कटामागील सूत्रधारांवर कारवाई करण्याची घोषणाही इस्रायलने केली होती. या कटाचे खोदयारी यांच्याशी संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही आठवड्यांमध्ये इराणच्या रस्त्यांवर रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍च्या अधिकाऱ्यांची हत्या होण्याची ही दुसरी घटना ठरते. याआधी इराणमध्ये अणुकार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. 2010 सालापासून ते आतापर्यंत अशा आघाडीच्या सहा अणुशास्त्रज्ञांची इराणमध्ये हत्या झाली आहे. 2020 साली मोहसिन फखरीझादेह या सर्वात वरिष्ठ शास्त्रज्ञाची हत्या झाली होती. फखरीझाजादेह यांच्या हत्येसाठी एक टन वजनाची रिमोट कंट्रोल गन वापरण्यात आल्याचा आरोपही इराणने केला होता.

या सर्व हल्ल्यांसाठी इराणने इस्रायल तसेच अमेरिकेला जबाबदार धरले होते. इस्रायलने आत्तापर्यंत आपल्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. दरम्यान कर्नल खोदयारी यांच्या हत्येनंतर इराणने मोसादच्या एजंटसचे मोठे जाळे उद्धवस्त केल्याचा दावा केला आहे. पण इराणमधील माध्यमांमध्ये या बातमीबाबत संभ्रम असल्याचे समोर येत आहे.

leave a reply