चीनने हल्ला चढविल्यास तैवानच्या रक्षणासाठी अमेरिका लष्कर तैनात करील

- राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

Bidenटोकिओ/तैपेई – ‘चीनने तैवानविरोधात बळाचा वापर करणे कधीही योग्य ठरणार नाही. अशा प्रकारच्या हल्ल्याने संपूर्ण क्षेत्रात अस्थैर्य माजेल. चीनची तैवानवरील कारवाई युक्रेनवर झालेल्या आक्रमणाप्रमाणेच असेल. चीनची विमाने व युद्धनौका तैवानच्या हद्दीनजिक वावरत आहेत. अशा हालचालींमधून चीन धोक्याशी खेळत आहे’, असे सांगून चीनने तैवानवर हल्ला चढविलाच तर अमेरिका तैवानच्या रक्षणासाठी आपले लष्कर तैनात करील असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केला.

china-taiwan-reutersचीनच्या हल्ल्याविरोधात अमेरिका तैवानच्या सुरक्षेची काळजी घेईल, असे वक्तव्य करण्याची अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात केलेल्या वक्तव्यावर अमेरिकेचा संरक्षण विभाग तसेच व्हाईट हाऊसला खुलासा करणे भाग पडले होते. बायडेन यांच्या नव्या वक्तव्यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याचा चीन तीव्र शब्दात निषेध करतो, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत चीन व रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशिया-युक्रेन युद्ध व चीनच्या तैवानविरोधातील कारवायांची तुलना केली. ‘चीनला तैवानवर आक्रमण करण्यापासून रोखायचे असेल तर युक्रेनमधील आक्रमणावरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना जबर किंमत मोजण्यास भाग पाडावे लागेल. तसे झाले तर चीनसह इतर देशांना बळाचा वापर स्वीकारार्ह नसल्याचा संदेश जाईल’, अशा शब्दात अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी आपली भूमिका मांडली.

China Foreign Ministry spokesperson Wang Wenbin holds press conference in Beijingबायडेन यांच्या याच वक्तव्यावरून पत्रकारांनी त्यांना चीन-तैवान संघर्षाबाबतचे अमेरिकेचे धोरण काय असेल, असा प्रश्न केला. रशिया-युक्रेन संघर्षात अमेरिकेने थेट सहभाग न घेण्यामागे काही कारणे होती. पण तैवानच्या रक्षणासाठी अमेरिका लष्कर तैनात करेल का? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर, होय अमेरिकेने तसे वचन दिले आहे, असे उत्तर बायडेन यांनी दिले. बायडेन यांच्या वक्तव्यानंतर व्हाईट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात, तैवान क्षेत्रातील स्थैर्य व शांतता कायम राखण्यासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या ‘वन चायना पॉलिसी’त बदल झाला नसल्याचा खुलासाही करण्यात आला.

बायडेन यांच्या वक्तव्यावर चीनने नाराजी व्यक्त केली. ‘अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याचा चीन तीव्र शब्दात निषेध नोंदवित आहे. तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी बजावले. अमेरिकेने तैवानच्या स्वातंत्र्याचा बचाव करु नये, असा इशाराही परराष्ट्र विभागाने दिला.
अमेरिका एका बाजूला तैवानच्या सुरक्षेचे वचन देत असला तरी या देशाबाबत उघडपणे चीनच्या विरोधात जाण्यास अद्यापही तयार नाही. अमेरिकेकडून सोमवारी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’नध्ये तैवानचा समावेश करण्यात आलेला नाही.

leave a reply