अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला चीनपासून सर्वाधिक धोका

- तपासयंत्रणा ‘एफबीआय’च्या प्रमुखांचा आरोप

राष्ट्रीय सुरक्षेलावॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेतृत्त्वाच्या निकषांबाबत असलेला तिटकारा, आर्थिक वर्चस्वाची हाव आणि अमेरिकेच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न यासारख्या गोष्टींमुळे चीन हा अमेरिकेच्या सुरक्षेला असणारा सर्वात मोठा व गंभीर धोका ठरतो, असा इशारा अमेरिकी तपासयंत्रणा ‘एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी दिला. अमेरिकेबरोबरच पाश्‍चात्य जगताला असणारा चीनचा धोका अधिक प्रकर्षाने उघड होत असून त्यामुळे होणारी हानीदेखील मोठी असल्याचे रे यांनी यावेळी बजावले. एफबीआयने चीनमध्ये हिवाळी ऑलिंपिकसाठी जाणार्‍या अमेरिकी खेळाडूंसाठीही स्वतंत्र निवेदन जारी केले असून नियमित फोनऐवजी ‘बर्नर फोन’ घेऊन जा, अशी शिफारस केली आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकी प्रशासनाने चीनच्या विरोधात आक्रमक राजनैतिक संघर्ष छेडला होता. नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना हे धोरण कायम राखणे भाग पडले असले तरी चीनविरोधातील कारवाईची धार कमी झाल्याचे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील प्रमुख तपासयंत्रणा असणार्‍या ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’च्या प्रमुखांनी चीनच्या राजवटीकडून सुरू असणार्‍या कारवायांचे वास्तव मांडणे लक्ष वेधून घेणारे ठरते. यापूर्वी २०२० साली ट्रम्प यांच्या कार्यकाळातही रे यांनी चीनच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून दिली होती. ‘रोनाल्ड रिगन प्रेसिडेन्शिअल लायब्ररी ऍण्ड म्युझियम’च्या कार्यक्रमात त्याचा पुनरुच्चार करून त्यांनी चीनचा धोका अधिक वाढल्याचे वजावले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेला‘अमेरिका व चीनची अर्थव्यवस्था परस्परांशी मोठ्या प्रमाणात जोडली गेली आहे. अमेरिकेत चीनमध्ये तयार झालेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे. अमेरिका व चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची देवाणघेवाण सुरू आहे. आर्थिक वर्चस्व मिळविण्यासाठी चीन या गोष्टींचा पुरेपूर व उघडपणे वापर करताना दिसत आहे. चीनच्या राजवटीकडून सुरू असलेल्या कारवायांची दोन हजारांहून अधिक प्रकरणे आमच्याकडे नोंदविण्यात आली आहेत. चीन फक्त अमेरिकेतील गोपनीय माहिती अथवा तंत्रज्ञानावर डल्ला मारत नाही तर हा देश अमेरिकेतील संकल्पना, संशोधन व आर्थिक सुरक्षेला असणारा मोठा धोका बनत चालला आहे’, असा इशारा एफबीआयच्या प्रमुखांनी दिला.

एखादी गोष्ट मिळविण्यासाठी चीनची राजवट फक्त हेरगिरी किंवा सायबरहल्ल्यांपुरती मर्यादित पावले उचलत नाही तर सर्व उपलब्ध मार्गांचा प्रयत्न करते व त्यामुळेच चीनचे धोरण अधिक धोकादायक असल्याची जाणीव रे यांनी करून दिली. केवळ आर्थिक वर्चस्व मिळवून चीनची भूक भागणार नसून चिनी राजवटीला अमेरिकेच्या अंतर्गत व्यवस्थेत घुसखोरी करून ती कमकुवत करायची आहे, असा आरोपही एफबीआयच्या प्रमुखांनी केला.

leave a reply