येमेनमधील संघर्षबंदीचा प्रस्ताव धुडकावून हौथींचा सौदीच्या विमानतळावर ड्रोन हल्ला

संघर्षबंदीचा प्रस्तावदुबई/सना – येमेनमधील सहा वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष रोखण्यासाठी सौदी अरेबियाने हौथी बंडखोरांना संघर्षबंदीचा प्रस्ताव दिला होता. ‘येमेनची जनता किंवा इराण, यापैकी कुणाच्या हितसंबंधाना प्राथमिकता द्यायची, ते हौथींनी ठरवावे’, असे सौदीने आपल्या प्रस्तावात म्हटले होते. पण हौथी बंडखोरांनी सौदीच्या विमानतळावर ड्रोनचा हल्ला चढवून संघर्षबंदीचा प्रस्ताव धुडकावला आहे.

सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी सोमवारी येमेनमधील सौदीसमर्थक आघाडी सरकार तसेच इराणसंलग्न हौथी बंडखोरांसमोर संघर्षबंदीचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव देताना सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हौथींसाठी दोन सवलतीही जाहीर केल्या. यामध्ये येमेनचे सना विमानतळ पुन्हा सुरू करण्याची परवानगी सौदीने दिली. यापुढे सौदी व अरब मित्रदेशांकडून या विमानतळावर हल्ले चढविले जाणार नसल्याचे आश्‍वासन सौदीने दिले.

संघर्षबंदीचा प्रस्तावत्याचबरोबर हौदेदा बंदराची केलेली कोंडी काढून हौथींना इंधनाची निर्यात करण्याची परवानगी दिल्याचेही प्रिन्स फैझल यांनी जाहीर केले. या इंधनाच्या निर्यातीमुळे येमेनच्या तिजोरीत जमा होणार्‍या रक्कमेचाही हौथी लाभ घेऊ शकतात, असे सौदीने स्पष्ट केले होते. याबाबत हौथींना कुठलीही विचारणा केली जाणार नसल्याचे सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. फक्त ‘हौथींनी येमेनची जनता किंवा इराण, यापैकी कुणाच्या हितसंबंधाना प्राथमिकता द्यायची, हे त्यांनी ठरवावे’, असे फैझल म्हणाले होते.

याआधी हौथी बंडखोरांनी इंधनाच्या निर्यातीतून जमा होणारा सुमारे २० कोटी डॉलर्सचा निधी ताब्यात घेऊन यातील छोटीशी रक्कम सरकारी कर्मचार्‍यांचे पगार देण्यात खर्च केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातही ही गोष्ट नमूद करण्यात आली होती. अशा परिस्थितीत, येमेनमधील संघर्षबंदीच्या प्रस्तावाद्वारे सौदीने हौथींना मोठी मोकळीक दिल्याचे बोलले जात होते. अमेरिकेने सौदीच्या या संघर्षबंदीच्या प्रस्तावाचे स्वागत केले होते. पण हौथींनी सौदीचा हा प्रस्ताव धुडकावला.

संघर्षबंदीचा प्रस्तावयेमेनमधील संघर्ष संपविण्यासाठी सौदीने दिलेल्या प्रस्तावात नवे असे काहीच नसल्याची टीका हौथी संघटनेचा प्रवक्ता मोहम्मद अब्दुलसलाम याने केली. येमेनमधील संघर्षाचा एक भाग असलेल्या सौदीने येमेनवर लादलेले सर्व निर्बंध मागे घ्यावे, अशी मागणी अब्दुलसलाम याने केली. सौदीने हौथींच्या १४ जहाजांची सुटका करावी, असे सांगून अब्दुलसलाम याने सौदीचा प्रस्ताव फेटाळला. यानंतर पुढच्या काही तासातच हौथी बंडखोरांनी सौदीच्या दक्षिणेकडील विमानतळावर ड्रोन हल्ला चढविला. सौदीने याबाबत तपशील देण्याचे टाळले आहे.

२०१५ सालापासून येमेनमध्ये गृहयुद्ध भडकले असून यामध्ये एक लाख ३० हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या संघर्षामुळे लाखो जण विस्थापित झाले असून दीड कोटी येमेनी जनतेवर दुष्काळाचे संकट कोसळल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. येमेनमध्ये भीषण मानवी आपत्ती कोसळली असल्याची चिंता याआधीही अनेकजणांनी व्यक्त केली होती. येमेनच्या ८० टक्के भूभागावर हौथींचा ताबा असून राजधानी सना व हौदेदा सारखी महत्त्वाची प्रशासकीय व आर्थिक शहरे या बंडखोर संघटनेच्याच नियंत्रणात आहेत. पण येमेनमधील या संकटासाठी इराणसंलग्न हौथी बंडखोरांपेक्षाही सौदी अरेबिया जबाबदार असल्याचा ठपका संयुक्त राष्ट्रसंघ तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना ठेवत आहेत.

दरम्यान, याआधीही हौथी बंडखोरांनी सौदीचा संघर्षबंदीचा प्रस्ताव धुडकावला होता. अमेरिकेने दहशतवाद्यांच्या यादीतून हौथी बंडखोरांचे नाव वगळल्यानंतर, या संघटनेची आक्रमकता वाढत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

leave a reply