हौथी बंडखोरांचे सौदीच्या प्रवासी विमानावर हल्ले

प्रवासी विमानावरसना/रियाध – येमेनमधील इराणसमर्थक हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या प्रवासी विमानावर ड्रोन हल्ले चढवून सुडाची धमकी दिली आहे. हौथी बंडखोरांच्या या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याचे सौदीने म्हटले आहे. तसेच सौदी व अरब मित्रदेश संघर्षबंदीसाठी तयार झालेले असताना, हौथी बंडखोर सौदीवर हल्ले चढवून युद्धासाठी नवी चिथावणी देत असल्याचा दावा पाश्‍चिमात्य तसेच आखाती माध्यमे करीत आहेत.

सौदी सरकारशी संलग्न असलेल्या वृत्तवाहिनीने हौथी बंडखोरांनी चढविलेल्या हल्ल्याची बातमी प्रसिद्ध केली. बुधवारी दुपारी हौथी बंडखोरांनी सौदीच्या नैऋत्येकडील अभा विमानतळावर चार ड्रोनचे हल्ले चढविले. हे चारही ड्रोन बॉम्बने सज्ज होते. यापैकी दोन ड्रोन्स विमानतळावर उभ्या असलेल्या प्रवासी विमानावर कोसळले. यानंतर विमानाने पेट घेतला पण यात कुणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. अग्नीशमन दलाने वेळीच ही आग विझवली.

प्रवासी विमानावर

यानंतर हौथी बंडखोरांनी प्रतिक्रिया देऊन सदर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. सौदी आणि अरब मित्रदेशांनी आमच्या देशात चढविलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हे ड्रोन हल्ले चढविले. यापुढेही सौदी व अरब देशांना असेच प्रत्युत्तर दिले जाईल, असे हौथी बंडखोरांनी धमकावले. तसेच सौदीच्या लष्करी तळावर आपण हल्ला चढविला होता, सदर ठिकाणी प्रवासी विमान नव्हते, असा दावा हौथी बंडखोरांनी केला. पण सौदीच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या बातमीत हौथी बंडखोरांच्या हल्ल्यात प्रवासी विमानाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रवासी विमानावरगेल्या महिन्याभरात हौथी बंडखोरांनी प्रवासी विमानतळावर चढविलेला हा दुसरा मोठा हल्ला ठरतो. याआधी हौथी बंडखोरांनी येमेनच्याच प्रवासी विमानतळावर रॉकेट हल्ले चढविले होते. सौदीतून येमेन सरकारच्या नेत्यांना घेऊन दाखल झालेल्या विमानावर हौथींनी हल्ले चढविले होते. या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर हौथी बंडखोरांनी येमेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ले चढविले होते.

दरम्यान, इराणचे समर्थन असलेल्या दहशतवादी संघटनांकडून सौदीसह या क्षेत्रातील प्रत्येक देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी काही तासांपूर्वी दिला होता. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने वेळीच इराण आणि इराणसमर्थक दहशतवादी संघटनांवर कारवाई केली नाही तर या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण होईल, असे सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले होते.

leave a reply