अमेरिकेच्या युद्धनीतिला रोखण्यासाठी रशियाने अचानक व व्यापक प्रमाणात हवाईहल्ले चढवावेत

-रशियाच्या संरक्षणविषयक तज्ज्ञांचा सल्ला

हवाईहल्लेमॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेची बहुक्षेत्रीय युद्धनीति रशियाच्या अस्तित्त्वासाठी धोका असून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लढाऊ विमाने, बॉम्बर्स व ड्रोन्सच्या सहाय्याने व्यापक प्रमाणात हवाईहल्ले चढवावेत, असा आक्रमक सल्ला रशियाच्या संरक्षणविषयक तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्याच महिन्यात एका आंतरराष्ट्रीय फोरमला संबोधित करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्षाचा भडका उडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसातच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाविरोधात आक्रमक धोरण स्वीकारण्याचे संकेत देत युरोपात चार प्रगत बॉम्बर्स विमाने तैनात करण्याचा निर्णय घेतला होता.

रशियन हवाईदलाचा भाग असणार्‍या ‘झुकोव्हस्कि-गागारीन एअरफोर्स अ‍ॅकॅडमी’कडून ‘एरोस्पेस फोर्सेस, थिअरी अ‍ॅण्ड प्रॅक्टिस’ नावाचे त्रैमासिक प्रसिद्ध करण्यात येते. या त्रैमासिकात प्राध्यापक स्टुशिन्स्की व कोरोल्कोव्ह यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात रशियाने अमेरिकेविरोधात ‘प्री-एम्प्टिव्ह इंटिमिडेशन स्ट्राईक’चा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिका आपल्या शत्रूंविरोधात ‘मल्टिडोमेन वॉर फायटिंग स्ट्रॅटेजी’ विकसित करीत आहे.

हवाईहल्लेअमेरिकेच्या या युद्धनीतित हवाईक्षेत्र, सागरी क्षेत्र, जमीन, सायबरक्षेत्र व अंतराळ या सर्वांचा एकत्रित वापर करून शत्रूला निष्प्रभ करण्याच्या योजनेचा समावेश आहे. अमेरिकेचे हे धोरण रशियाच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा व घातक ठरणारा धोका आहे. या धोरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात हवाईहल्ले चढवून शत्रूचे अपरिमित नुकसान घडविणे प्रभावी ठरु शकते. त्यासाठी रशियन संरक्षणदलांनी लढाऊ विमाने, ड्रोन्स, क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर व हायरपसोनिक शस्त्रांचा वापर करावा आणि अमेरिका व नाटोला पहिला हल्ला करण्यापासून रोखावे, असा सल्ला रशियाच्या संरक्षणविषयक तज्ज्ञांनी दिला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या काही वर्षांपासून संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. याअंतर्गत रशियाने नव्या तंत्रज्ञानाचा वापर असणार्‍या अनेक संरक्षणयंत्रणा तसेच प्रगत अण्वस्त्रेही विकसित केली आहेत. गेल्याच वर्षी रशियाने आपले अण्वस्त्रविषयक धोरणही बदलले आहे. त्याचवेळी रशियावर लादण्यात येणारे निर्बंध तसेच सायबरहल्ले याविरोधातही पुतिन यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. असे व्यापारी अडथळे, अवैध आर्थिक व तंत्रज्ञानविषयक तसेच माहितीच्या संदर्भातील निर्बंध लष्करी कारवाईला आमंत्रण देऊ शकतात, असा इशाराही पुतिन यांनी नुकताच दिला होता.

या पार्श्‍वभूमीवर, रशियन तज्ज्ञांकडून ‘प्री-एम्प्टिव्ह इंटिमिडेशन स्ट्राईक’चा सल्ला दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply