हुवेईच्या वँगझाऊ मेंग यांची सुटका हा चीनचा विजय

- चिनी प्रसारमाध्यमांचा बढाईखोर दावा

बीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिकेच्या न्याय विभागाबरोबर ‘डिफर्ड प्रॉसिक्युशन ऍग्रीमेंट’वर केलेल्या स्वाक्षरीनंतर हुवेईच्या संचालिका वँगझाऊ मेंग यांची सुटका करण्यात आली आहे. मेंग यांची सुटका होण्यापूर्वी चीनने मायकल कोवरिग व मायकल स्पॅवर या कॅनेडियन नागरिकांची सुटका केली आहे. त्यामुळे या कॅनेडियन नागरिकांना चीनने मेंग यांच्या बदल्यात ‘ओलिस’ ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र चीनच्या माध्यमांनी मेंग यांची सुटका चीनच्या राजवटीने अमेरिकेविरोधात राबविलेल्या धोरणाचा विजय असल्याचे दावे करण्यास सुरुवात केली आहे.

हुवेईच्या वँगझाऊ मेंग यांची सुटका हा चीनचा विजय - चिनी प्रसारमाध्यमांचा बढाईखोर दावाचीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीशी संबंध असणार्‍या ‘हुवेई’ कंपनीच्या संचालिका वँगझाऊ मेंग यांना डिसेंबर २०१८मध्ये कॅनडात ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. मात्र मेंग यांनी याविरोधात कायदेशीर याचिका दाखल करून प्रत्यार्पण रोखण्याची मागणी केली होती. त्याचवेळी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने अमेरिका व कॅनडाला धमकावित राजनैतिक तसेच इतर पातळ्यांवर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र कॅनडाच्या यंत्रणांनी सलग सुमारे तीन वर्षे मेंग यांना नजरकैदेत ठेवले होते.

शुक्रवारी मेंग यांनी अमेरिकेत झालेल्या सुनावणीत ‘व्हर्च्युअल’ सहभाग घेऊन अमेरिकी यंत्रणांनी दिलेला प्रस्ताव मान्य केला. त्यांनी अमेरिकेच्या न्याय विभागाबरोबर ‘डिफर्ड प्रॉसिक्युशन ऍग्रीमेंट’वर स्वाक्षरी केली असून आपण दोषी नसल्याचा दावा केला आहे. या करारानुसार, अमेरिका मेंग यांच्याविरोधात कारवाई करणार नसली तरी हुवेई कंपनीविरोधातील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे. मेंग यांच्या सुटकेपूर्वी चीनने मायकल कोवरिग व मायकल स्पॅवर या कॅनेडियन नागरिकांची सुटका केली आहे.

हुवेईच्या वँगझाऊ मेंग यांची सुटका हा चीनचा विजय - चिनी प्रसारमाध्यमांचा बढाईखोर दावाचीनची प्रसारमाध्यमे व विश्‍लेषकांनी मेंग यांची सुटका हा चीनचा विजय असल्याचे दावे करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने अमेरिका व कॅनडाविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका आणि सातत्याने टाकलेले दडपण यामुळे दोन्ही देशांनी मेंग यांची सुटका केल्याचे ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी मुखपत्राने म्हंटले आहे. यावेळी जुलै महिन्यात झालेल्या अमेरिका-चीन बैठकीचा उल्लेख करण्यात आला आहे. या बैठकीत चीनने दिलेल्या ‘लिस्ट’मध्ये मेंग यांच्या सुटकेचा समावेश होता व त्यांची सुटका करून अमेरिकेने आपली चूक मान्य केल्याची बढाई चिनी मुखपत्राने मारली आहे.

मात्र परदेशी माध्यमांनी कॅनेडियन नागरिकांची सुटका व मेंग यांची सुटका परस्परांशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले आणि चीनचे दावे खोटे ठरले याकडे लक्ष वेधले आहे. चीनच्या सत्ताधार्‍यांकडून सातत्याने मेंग व कॅनेडियन नागरिकांवरील कारवाईचा संबंध नसल्याचे म्हंटले होते. मात्र गेल्या २४ तासांमधील घटनांमधून चीनने ‘होस्टेज डिप्लोमसी’चा वापर केल्याच्या दाव्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे आरोप परदेशी माध्यमांनी केले आहेत. दरम्यान, मेंग यांच्या सुटकेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविरोधातील टीकेची धार अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत. बायडेन प्रशासन चीनसमोर झुकल्याचे मेंग यांच्या सुटकेवरून दिसून येत असल्याची टीका रिपब्लिकन पक्षाकडून सुरू होईल, असा दावा करण्यात येत आहे.

leave a reply