नाटोचे सदस्य देशच दहशतवादाचे समर्थक

- तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

अंकारा – ‘फिनलँड आणि स्वीडन हेच केवळ दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे युरोपमधील देश नाहीत. तर नाटोचे सदस्य असणारे जर्मनी आणि फ्रान्स हे देखील दहशतवादाचे समर्थक आहेत`, असा गंभीर आरोप तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी केला. नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज देणारे फिनलँड आणि स्वीडन हे दोन्ही देश दहशतवाद्यांचे पाठीराखे असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी दोन दिवसांपूर्वीच ठेवला होता. यात आता जर्मनी व फ्रान्सचा समावेश करून तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी सनसनाटी माजविली आहे.

स्वीडन व फिनलँड हे रशियाच्या प्रभावक्षेत्रातील देश नाटोमध्ये सहभागी होण्याची तयारी करीत आहेत. गेली 75 वर्षे फिनलँड व स्वीडनने अमेरिका-रशियातील वादापासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते. पण आता हे तटस्थ धोरण सोडून फिनलँड व स्वीडन नाटोमध्ये प्रवेश करण्याची तयारी करीत आहेत. पुढच्या काळात रशिया युक्रेनप्रमाणे तुमच्यावरही हल्ले चढवू शकतो, अशी शक्यता वर्तवून अमेरिक व नाटोच्या इतर सदस्यदेशांनी फिनलँड आणि स्वीडनला घाबरविले होते. या भीतीपोटीच फिनलँड आणि स्वीडनने नाटोकडे आपल्याला सामील करून घेण्याची विनंती केली आहे. नाटोतील आघाडीचे देश असणाऱ्या ब्रिटन तसेच जर्मनीने फिनलँड व स्वीडनच्या नाटोतील सदस्यत्वाची प्रक्रिया ‘फास्ट-ट्रॅक` करण्याचे संकेत दिले होते. पण तुर्कीसह नाटोतील काही सदस्य देशच फिनलँड आणि स्वीडनच्या सदस्यत्वाला विरोध करीत आहेत.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी याबाबत अधिक आक्रमक भूमिका स्वीकारून फिनलँड आणि स्वीडन दहशतवादाचे समर्थक असल्याचा ठपका ठेवला. तुर्कीने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या `कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके`च्या दहशतवाद्यांना फिनलँड आणि स्वीडन आश्रय देत असल्याचे आरोप एर्दोगन यांनी केले होते. अमेरिका आणि युरोपिय महासंघाने पीकेकेला याआधीच दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. असे असतानाही फिनलँड आणि स्वीडनचा नाटोतील समावेश या संघटनेच्या नियमांविरोधातच जाणारा ठरेल, अशी टीका एर्दोगन यांनी केली होती. फिनलँड आणि स्वीडनने पीकेकेवर कारवाईची हमी दिली, तरच त्यांच्या नाटोतील प्रवेशाला परवानगी देण्याची घोषणा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केली होती.

याला दोन दिवसही उलटत नाही तोच, राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी जर्मनी, फ्रान्स तसेच नेदरलँड्सवर दहशतवाद समर्थक असल्याचे आरोप केले. तुर्कीमध्ये घातपात घडविणाऱ्या ‘पीकेके` तसेच बंड घडविणाऱ्या ‘फेटो` या संघटनांना जर्मनी, फ्रान्स व नेदरलँड्सचे समर्थन असल्याची टीका एर्दोगन यांनी केली. फिनलँड, स्वीडन, जर्मनी, फ्रान्स व नेदरलँड्सचे पोलीस तुर्कीद्वेष्ट्या दहशतवादी संघटनांची सुरक्षा करीत असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ठेवला. यासाठी तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी पीकेकेने युरोपिय देशांमध्ये आयोजित केलेल्या ‘लाँग मार्च`चा दाखला दिला.

दरम्यान, फिनलँड व स्वीडनच्या नाटोतील सहभागाविरोधात तुर्कीने घेतलेली भूमिका व आत्ता जर्मनी, फ्रान्सवर केलेल्या आरोपांमुळे नाटोमधील मतभेद अधिक प्रकर्षाने समोर येत आहेत.

leave a reply