इराण अण्वस्त्रांनी सज्ज झाला तर भीषण अणुयुद्ध पेटेल

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

जेरूसलेम – ‘इराणचा अणुकार्यक्रम अतिशय धोकादायक मार्गाने पुढे जात असून इराण अण्वस्त्रांनी सज्ज झाला तर इतिहास बदलेल. या अण्वस्त्रांच्या जोरावर इराण साऱ्या जगाला वेठीस धरेल आणि यातून भीषण अणुयुद्ध पेट घेईल’, असा थरकाप उडविणारा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. त्याचवेळी अण्वस्त्रसज्जता संपादन करणारा इराण इस्रायल अजिबात खपवून घेणार नसल्याचे नेत्यान्याहू यांनी ठणकावले.

netanyahu iranआंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत दिलेली माहिती, इराणमधील राजवटीच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने आणि इराण-इस्रायलमधील इतिहास यावर इस्रायलच्या पंतप्रधानांनी ब्रिटनस्थित इराणी वृत्तवाहिनीला मुलाखती दिली. गुरुवारी इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालेली ही मुलाखत इराणी जनतेसाठी पर्शियन भाषेत देखील अनुवादीत करुन प्रसारीत करण्यात आली. यामध्ये इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणचा अणुकार्यक्रम इराणसह इस्रायल व जगासाठी धोकादायक असल्याचे ठासून सांगितले. ‘इराण फक्त माझ्या परराष्ट्र धोरणाचा भाग नाही. तर इराण हा माझ्या परराष्ट्र धोरणाचा सर्वार्थाने केंद्रबिंदू आहे. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठीच मी पुन्हा सत्तेवर आलो आहे. कारण इराण अण्वस्त्रसज्ज झालाच तर ‘डॉमिनो इफेक्ट’ होऊन आखातातील प्रत्येक देश अण्वस्त्रसज्जतेसाठी प्रयत्न करील, स्वत:ला अण्वस्त्रसज्ज करण्यासाठी आखाती देशांमध्ये स्पर्धा भडकेल’, याकडे नेत्यान्याहू यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी लष्करी कारवाईची आवश्यकता असल्याच्या विधानावर आपण ठाम असल्याचे नेत्यान्याहू म्हणाले.

इराणला अण्वस्त्रसज्ज करून या देशाची राजवट आपल्याच देशाच्या विनाशाची तयारी करीत आहे, अशा शब्दात इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणवर ताशेरे ओढले. जर इराण दहशतीचे सर्वात मोठे शस्त्र असलेल्या अण्वस्त्राने सज्ज झालाच तर या देशाची राजवट साऱ्या जगाला वेठीस धरेल. अण्वस्त्रसज्ज इराण जगाचा इतिहास बदलेल, यामुळे अणुयुद्ध पेट घेईल, असा इशारा नेत्यान्याहू यांनी दिला.

iran fordo nuclear mapतर गेल्या सहा महिन्यांपासून इराणमध्ये राजवटीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना इस्रायलच्या पंतप्रधानांनी समर्थन दिले. महिला, पुरुष, तरुण, मुलांचा सहभाग असलेल्या या निदर्शनांनी मोठे यश मिळविले असून इराणची राजवट हादरल्याचा दावा नेत्यान्याहू यांनी केला. तर इराणच्या जनतेवर अत्याचार करणारी आणि जगभरात आपल्या कारवायांनी दहशत निर्माण करणारी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सही दहशतवादी संघटनाच असल्याचा पुनरुच्चार नेत्यान्याहू यांनी केला.

इस्रायल व इराण इतिहासाने जोडलेले असल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू म्हणाले. यासाठी इस्रायलच्या पंतप्रधानांनी ‘सायरस द ग्रेट’ची आठवण करुन दिली. इतिहासाप्रमाणे आत्ताही इस्रायल आणि इराणमध्ये संबंध सुधारू शकतात. इराणमध्ये इस्लामी राजवट प्रस्थापित होण्याआधी इस्रायलबरोबर इराणचे चांगलेच संबंध होते. पण इराणवर राजवटीची पकड असेपर्यंत हे शक्य नसल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याआधी इस्रायलच्या पंतप्रधानांनी पर्शियन नववर्षाच्या निमित्ताने इराणच्या जनतेला शुभेच्छा देताना इराणची राजवट आपल्या जनतेचा विचार करीत नसल्याचे म्हटले होते. तर आत्ताही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इराणी जनतेला दिलेल्या संदेशात अणुकार्यक्रम इराणी जनतेच्या हिताचा नसल्याचे सांगितले. तसेच इराणची राजवट आपल्या जनतेचेच मोठे नुकसान करीत असल्याचा ठपका पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी ठेवला आहे.

leave a reply