जपानवर हल्ला होईल किंवा युद्धात ओढला जाईल

जपानच्या ८६ टक्के नागरिकांची चिंता

टोकिओ – आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढता तणाव, संयुक्त राष्ट्रसंघामध्ये असलेला निर्णयक्षमतेचा अभाव आणि संरक्षणसज्जतेसाठी इतर देशांवरील जपानचे अवलंबित्व, या कारणांमुळे येत्या काळात जपानवर हल्ला होईल. अथवा आपला देश युद्धात ओढला जाऊ शकतो, अशी चिंता जपानमधील बहुसंख्य जनतेला वाटत आहे. एका पाहणीत ही बाब समोर आली. २०१८ सालच्या तुलनेत जपानवरील हल्ल्याची शक्यता वाढविल्यामुळे जपानच्या यंत्रणांची चिंता वाढल्याची बाबही याच पाहणीतून समोर आली आहे.

Japan will be attacked जपानच्या मंत्रीमंडळाकडून दर चार वर्षांनी ई-मेलच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाते. दोन महिन्यांपूर्वी १८ वर्षांवरील तीन हजार जणांकडून जपानच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ८६.२ टक्के जणांनी जपानवर हल्ल्याची किंवा आपला देश युद्धात ओढला जाण्याची शक्यता वर्तविली. रशिया-युक्रेन युद्ध, चीनची लष्करी आक्रमकता आणि उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे जपानवरील हल्ल्याची शक्यता वाढल्याचे जपानी जनतेने या सर्वेक्षणात म्हटले आहे.

२०१८ साली घेतलेल्या सर्वेक्षणात ८५.५ टक्के जणांनी युद्धाचा धोका वाढल्याचे म्हटले होते. मात्र यावेळी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे हा धोका वाढल्याचे जपानचे नागरिक सांगत आहेत. जवळपास ८५.७ टक्के जणांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढता तणाव यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले. तर ३८.२ टक्के जणांनी जपानवरील युद्धाचे संकट संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यपद्धतील दोष, निर्णयक्षमतेतील अभावामुळे वाढल्याचे मत नोंदविले. तर जपान संरक्षणसज्ज नसल्याचा दावा २८.२ टक्के नागरिकांनी या सर्वेक्षणात केला.

अमेरिकेबरोबरचा सुरक्षाविषयक करार जपानसाठी सहाय्यक ठरत असल्याचा दावा करणाऱ्यांचे प्रमाण ८९.७ टक्के इतके आहे. तर ९.१ टक्के सदर करार जपानसाठी सहाय्यक ठरणार नसल्याचे ठामपणे सांगत आहेत. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या, ईस्ट व साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील चीनच्या लष्कराच्या आक्रमक हालचाली आणि रशियाचा युक्रेनवरील हल्ला ही जपानसमोरील आव्हाने मानली जातात. या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, आपला देश शस्त्रसज्जत नसल्याचे ५३ टक्के जपानी जनतेला वाटत आहे. चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत जपानी जनतेचा आपल्या देशाच्या संरक्षणसज्जतेवरील विश्वास कमी झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

leave a reply