अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या ‘सोशलिस्ट बजेट’वर विरोधी पक्षनेत्यांचे टीकास्त्र

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी प्रस्तावित केलेल्या बजेटवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे. २०२४ सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हॅले यांनी बायडेन यांचे वाभाडे काढले आहेत. ‘‘बायडेन अमेरिकेच्या इतिहासातले सर्वाधिक ‘समाजवादी’ राष्ट्राध्यक्ष आहेत व त्यांना दुसऱ्यांचा पैसा इतरांवर खर्च करायला खूपच आवडते’’ अशी जळजळीत टीका हॅले यांनी केली आहे. तर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या बजेटच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी पर्यायी बजेट तयार केल्याचेही समोर आले आहे.

socialist budgetराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ६.९ ट्रिलियन डॉलर्सचा अर्थसंकल्प प्रस्तावित केला. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हाने खडी ठाकलेली असताना देखील या अर्थसंकल्पात बायडेन यांनी कल्याणकारी योजनांवर प्रचंड प्रमाणात खर्च करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज ३१ ट्रिलियन डॉलर्सवर गेले असून याचे व्याज भरण्यासाठी नवे कर्ज घ्यावे लागत आहे. हे फार काळ चालू शकत नाही. अशा परिस्थितीतही राष्ट्राध्यक्ष बायडेन कल्याणकारी योजनांवर उधळपट्टी करीत असल्याची टीका निक्की हॅले यांनी केली.

कोरोनाची साथ आल्यानंतर अमेरिकन उद्योगक्षेत्राला सहाय्य करण्यासाठी सुमारे ५०० अब्ज डॉलर्सचा निधी जाहीर करण्यात आला होता. हा निधी मागे घ्या, अशी मागणी हॅले यांनी केली आहे. अशारितीने अमेरिकन करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करून बायडेन आपली समाजवादी धोरणे राबवित आहेत. मात्र हा पैसा अशारितीने उधळण्याचा त्यांना अधिकार नाही, असे निक्की हॅले यांनी बजावले आहे. तसेच कल्याणकारी योजनांसाठी श्रीमंतांवर अधिक कर लादण्याच्या बायडेन यांच्या धोरणांवर हॅले यांनी प्रहार केले आहेत.

हॅले यांच्यासह विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीच्या इतर नेत्यांनी देखील बायडेन यांच्या या प्रस्तावित अर्थसंकल्पावर तीव्र नाराजी व्यक्त केली. बायडेन यांच्या या बजेटला पर्याय देणाऱ्या बजेटची तयारी रिपब्लिकन पक्षाने केली असून यात कल्याणकारी योजनांपेक्षा अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या गोष्टींवर अधिक खर्च करण्याची तरतूद असल्याचे दावे केले जातात. त्यामुळे बायडेन यांनी जाहीर केलेल्या बजेटमुळे अमेरिकेतील राजकारण ढवळून निघाल्याचे दिसत आहे. पुढच्या काळात अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये रणकंदन माजण्याची शक्यता समोर येत आहे.

leave a reply