कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंचवीस गरीब देशांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्जसहाय्य

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरस साथीमुळे धोक्यात आलेल्या जगभरातील पंचवीस अत्यंत गरीब देशांना कर्ज सहाय्याची घोषणा करून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार या पंचवीस देशांना नाणेनिधीकडून आधी दिलेल्या कर्जाच्या परतफेडीत सवलत देण्यात आली आहे. तसेच यासाथीचा मुकाबला करण्यासाठी या गरीब देशांना नव्या कर्जाचाही पुरवठा करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख क्रिस्टलीना जॉर्जीवा यांनी याबाबतची घोषणा केली. नाणेनिधीच्या ‘कॅट्रास्ट्रोप कन्टेनमेंट ॲण्ड रिलीफ ट्रस्ट’द्वारे (सीसीआरटी) या कर्ज सवलतीची व नवे कर्ज जाहीर करण्यात आले आहे. अशाच स्वरूपाची सवलत याआधी २०१५ साली पश्चिम आफ्रिका खंडात ‘इबोला’ची साथ आली होती त्यावेळी देण्यात आली होती.

नाणेनिधीने अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतलेल्या पंचवीस देशांमध्ये आफ्रिका खंडातल्या बेनिन, बुर्किना फासो, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, चाड, कॉमोरॉस, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ दि कांगो, दि गाम्बिया, गिनिआ, गिनिआ-बिसाओ, हैती, लिबेरिया, मादागास्कर, मालावी, माली, मोझांबिक, नायजेर, रवांडा, साओ टोम ॲण्ड प्रिन्सिपी, सिआरा लिओन, सोलोमन आयलॅड, टोगो या देशांसह अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, नेपाळ आणि येमेन या आशियाई देशांचा समावेश आहे.

कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना आपल्या जनतेला आरोग्यविषयक उपचार पुरविणे व इत्यादी सुविधा देण्यासाठी हे कर्ज सहाय्य देत असल्याचे नाणेनिधीने म्हटले आहे. ह्या गरीब देशांना पुढील सहा महिन्यांपर्यंत कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय व इतर सहाय्यही पुरवले जाणार आहे.

सध्या सीसीआरटीकडे ५० अब्ज डॉलर्स एवढा निधी आहे. हा निधी अमेरिका, चीन, जपान, ब्रिटन आणि नेदरलॅंड या देशांनी पुरविलेला आहे. विकसनशील देशांनीही सीसीआरटीमध्ये निधी द्यावा, असे आवाहन आयएमएफच्या प्रमुखांनी केले आहे.

leave a reply