देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे

नवी दिल्ली – देशात कोरोनाव्हायरसमुळे गेलेल्या बळींची संख्या ३५४ वर पोहोचली आहे. मंगळवारी एकाच दिवसात कोरोनाव्हायरसच्‍या रुग्णांची संख्या १४६३ ने वाढून १०,८१५ च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात या साथीच्या रुग्णांची संख्या वाढून २६८४ झाली आहे. मंगळवारी राज्यात ३०० नवे रुग्ण आढळले, यातील २४२ रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबई देशातील कोरोनाव्हायरस संक्रमणाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला असताना मुंबईत वांद्रे स्थानकाबाहेर मंगळवारी हजारोचा जमाव एकत्र आला होता. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

मंगळवारी सकाळी पंतप्रध नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली. ”यापुढे लॉकडाऊनचे नियमांचे अधिक काटेकोर पालन करण्याकडे लक्ष पुरविण्यात येणार आहे. या साथीचे हॉटस्पॉट म्हणून पुढे आलेल्या ठिकाणांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक गाव, प्रत्येक पोलीस ठाणे, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्य अशा सर्व ठिकाणी लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी झाली, नियमांचे किती पालन केले गेले, हे काटेकोरपणे पहिले जाईल. या अग्निपरीक्षेत जे भाग यशस्वी होतील, जे भाग पुढे हॉट स्पॉट श्रेणीतून बाहेर पडतील, त्या भागात काही आवश्यक कामांसाठी लॉकडाऊनच्या अटी 20 एप्रिलनंतर शिथिल केल्या जातील” असेही पंतप्रधानांनी सांगितले. तसेच जेष्ठ नागरिकांची काळजी घ्या, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगच्या पालन करा, मास्क लावा, गरिबांची काळजी घ्या अशा एकूण सात सूत्रांचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधानांनी ही घोषणा देशात या साथीच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केली आहे. बहुतांश राज्यांनी व तज्ज्ञांनी याबाबत सूचना केली होती. तसेच याआधीच ११ राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. देशात या साथीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी देशात एकाच दिवसात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या १४६३ ने वाढून १०,८१५ च्या पुढे गेली आहे. २४ मार्चला घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी देश कोरोनाव्हायरसच्या साथ फैलावण्याच्या बाबतीत पहिल्या ५० देशातही नव्हता, मात्र आता भारताचा समावेश पहिल्या २३ देशात झाला आहे.

महाराष्ट्रात या साथीच्या रुग्णांची संख्या वाढून २६८४ वर पोहोचली आहे. दिल्लीत १५१०, तामिळनाडूत ११७३, राजस्थानात ८७९, मध्यप्रदेशात ७५०, उत्तरप्रदेशात ६५७ इतके रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. इतर राज्यातही या साथीचे रुग्ण वाढले आहेत.

मात्र असे असूनही काही जण सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत नसल्यामुळे वाढलेला संक्रमणाचा धोका चिंतेत भर टाकणारा आहे. मंगळवारी मुंबईतही कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना हरताळ फासणारी घटना घडली. वांद्रे स्थानकबाहेर तीन ते चार हजाराचा जमाव एकत्र आला होता. मुंबईत मजुरीनिमित्त तात्पुरते स्थलांतरित झालेल्या मजुरांचा हा जमाव होता व गावी जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात याव्यात अशी मागणी हा जमाव करीत होता. तसेच काही वृत्त अहवालात वांद्रे स्थानकातून बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे गाड्या सोडण्यात येत असल्याची अफवा उडाल्याने ही गर्दी उसळल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांना सौम्य लाठीमार करून हा जमाव पांगवावा लागला.

leave a reply