तुर्की युरोपमध्ये कोरोनाबाधित निर्वासित घुसविण्याच्या तयारीत

- ग्रीसच्या वर्तमानपत्राचा आरोप

अथेन्स – हजारो निर्वासितांचे लोंढे ग्रीसमार्गे युरोपात घुसविण्याची तयारी तुर्कीने केली आहे. सॅटेलाईट फोटोग्राफ्समुळे तुर्कीच्या या हालचाली उघड झाल्या आहेत. पण या निर्वासितांच्या आडून तुर्की युरोपमध्ये कोरोनाबाधितांना घुसविण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक आरोप ग्रीसच्या वर्तमानपत्राने केला आहे. यापार्श्वभूमीवर, ग्रीसने आपल्या सीमेच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षव्यवस्था केली असून तटरक्षक दलाबरोबर नौदल आणि हवाईदलाची गस्त वाढविली आहे.

तुर्कीने उभारलेल्या शरणार्थी शिबिरातून निर्वासितांना काढून पश्चिमेकडील किनार्‍याजवळ आणण्यास सुरुवात केली आहे. ग्रीस सरकारने प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोग्राफ्समधून या हालचाली उघड होत आहेत. ग्रीस सरकारचे प्रवक्ते स्तेईलोस पेतास यांनी तुर्कीच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या या हालचालींची नोंद घेऊन त्यासाठी तुर्कीला फटकारले आहे. ग्रीस आपल्या सार्वभौम अधिकारांच्या आणि सागरी सीमेच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे पेतास यांनी बजावले आहे. याआधीही तुर्कीने ग्रीसच्या सीमेवर निर्वासितांचे लोंढे सोडले होते. पण यावेळी सॅटेलाईटने टिपलेल्या निर्वासितांच्या हालचाली वेगळे संकेत देणारे असल्याचे पेतास यांनी सांगितले. यापार्श्वभूमीवर सागरी तसेच हवाई गस्त वाढविल्याची माहिती ग्रीसच्या सरकारने दिली आहे.

सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीत निर्वासितांचे लोंढे युरोपवर सोडण्याच्या तुर्कीच्या निर्णयावर ग्रीसच्या वर्तमानपत्राने संशय व्यक्त केला. तुर्की कोरोनाग्रस्त निर्वासितांना युरोपमध्ये घुसविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप या वर्तमानपत्राने केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून निर्वासितांच्या मुद्यावर तुर्की आणि युरोपिय महासंघात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. यानंतर तुर्कीने युरोपमध्ये निर्वासितांचे लोंढे सोडण्याची धमकी दिली होती. या निर्वासितांना सागरीमार्गे ग्रीसमध्ये घुसवून तुर्की युरोपिय देशांचा सूड घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा ग्रीसच्या वर्तमानपत्राने केला आहे.

युरोपिय देशांबरोबर झालेल्या करारानुसार सिरिया तसेच इतर देशांतून आलेल्या निर्वासितांना तुर्की आपल्या देशात आश्रय देत आहे. यासाठी युरोपिय देशांकडून तुर्कीला मोठे अर्थसहाय्य पुरविले जाते. पण या कराराचे उल्लंघन करुन तुर्कीने हजारो निर्वासित युरोपमध्ये घुसविण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. पण कोरोनाव्हायरसच्या संकटानंतर तुर्कीने निर्वासितांना रोखले होते. मात्र ग्रीसने प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोग्राफ्सनंतर तुर्की युरोपिय महासंघाला दिलेली धमकी प्रत्यक्षात उतरविण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

दरम्यान, तुर्कीमध्ये कोरोनाव्हायरसमुळे १२९६ जणांचा बळी गेला असून ६१ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

leave a reply