निवडणुकीच्या घोषणेसाठी पाकिस्तानच्या सरकारला इम्रान खान यांची सहा दिवसांची मुदत

इस्लामाबाद – पुढच्या सहा दिवसात पाकिस्तानात निवडणुकीची घोषणा करा, अन्यथा नव्या जनआंदोलनाला तोंड देण्याची तयारी ठेवा, असा इशारा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. यामुळे इम्रान खान यांच्या आझादी मार्चपासून पाकिस्तानच्या सरकारची काही दिवसांसाठी सुटका झाल्याचे दिसत आहे. त्याच्या आधी शक्तीप्रदर्शन करण्यात खान यशस्वी ठरले असून त्याचे दडपण पाकिस्तानच्या सरकारवर आल्याचे दिसत आहे. आपली मागणी मान्य झाली नाही, तर पाकिस्तानात आंदोलनाचा भडका उडेल, ही इम्रान खान यांची धमकी दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानात अराजक माजण्याचा धोका असल्याचे इशारे विश्लेषक देत आहेत.

electionsआपले सरकार कोसळल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानात निवडणूक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र पंतप्रधान शाहबाज शरीफ पाकिस्तानच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरले आणि त्यांचे सरकार सत्तेवर आले. हे सरकार आपल्याला मान्य नाही, असे सांगून इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या खऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईची हाक दिली होती. पाकिस्तानच्या वैफल्यग्रस्त युवावर्गाकडून इम्रानखान यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत इम्रान खान यांनी 25 मे रोजी आपल्या समर्थकांसह राजधानी इस्लामाबादमध्ये धडक देण्याची तयारी केली होती.

त्यांचा हा आझादी मार्च इस्लामाबादमध्ये दाखल होत असताना पोलीस आणि निदर्शकांमध्ये चकमकी झाल्याचे वृत्त आहे. यात दहा जण ठार झाले आहेत. तसेच खान यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी इम्रान खान यांच्या शेकडो समर्थकांना ताब्यात घेण्यात आले. तसेच या निदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधीच मिळू नये, यासाठी काही नेत्यांची धरपकड करण्यात आली. तरीही आपण या निदर्शनांमध्ये सहभागी होऊ, अशी धमकी या नेत्यांनी दिली. आपल्या कारवायांचा पाकिस्तानवर विघातक परिणाम होईल, यामुळे पाकिस्तानची यंत्रणा कोलमडण्याचा धोका आहे, हे इम्रान खान लक्षात घ्यायला तयार नाहीत, अशी टीका होत आहे.

या देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून परकीय गंगाजळीत अवघे काही आठवड्यांची आयात करता येईल, इतकाच निधी शिल्लक आहे. त्याचवेळी देशातील महागाई उच्चांक गाठत असून एका डॉलरसाठी 200 पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. अशा स्थितीत आंदोलन पुकारून आणि पाकिस्तानचे सरकार व लष्कराच्या विरोधात जनतेला भडकावून इम्रान खान या देशाचे तुकडे पाडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप जबाबदार पत्रकार करीत आहेत. इतकेच नाही तर खान यांच्या मागणीनुसार जून महिन्यात पाकिस्तानात निवडणुका घेतल्या, तर पाकिस्तानची अवस्था श्रीलंकेपेक्षाही बिकट बनले, असे या पत्रकारांचे म्हणणे आहे.

leave a reply