जगभरातील आघाडीच्या नौदलांमध्ये भारतीय नौदलाचा समावेश

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

भारतीय नौदलाचा समावेशकारवार – अत्याधुनिक, सक्षम, विश्वासार्ह शक्ती असलेले भारताचे नौदल हे पराक्रमी, सावध आणि सदैव विजयी ठरणारे आहे. आजच्या काळात जगभरातील आघाडीच्या नौदलांमध्ये भारतीय नौदलाचा समावेश केला जातो. जगातील मोठ्या नौदलांकडून भारतीय नौदलाशी सहकार्य करण्यासाठी उत्सूकता दाखविली जाते, असे गौरवोद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काढले आहेत.

कारवार येथील नौदलतळाला भेट देणाऱ्या संरक्षणमंत्र्यांनी ‘आयएनएस खंदेरी’ या पाणबुडीवरून सुमारे चार प्रवास केला. यावेळी ‘आयएनएस खांदेरी’चे सामर्थ्य व क्षमता प्रदर्शित करणारी प्रत्यक्षिके संरक्षणमंत्र्यांसमोर सादर करण्यात आली. यावेळी संरक्षणमंत्र्यांसह नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार आणि नौदलाचे व संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हेोते. यावेळी बोलताना संरक्षणमंत्र्यांनी नौदलाच्या सामर्थ्यावरील विश्वास नेमक्या शब्दात व्यक्त केला.

‘आयएनएस खंदेरी’ ही पाणबुडी ‘मेक इन इंडिया’ची क्षमता प्रदर्शित करणारी ठरते, असे राजनाथ सिंग म्हणाले. भारतीय नौदलासाठी उभारण्यात येत असलेल्या 41 युद्धनौका व पाणबुड्यांपैकी 39चे बांधकाम देशाच्याच शिपयार्डस्‌‍मध्ये सुरू आहे. ज्या वेगाने हे काम सुरू आहे, त्याने आत्मनिर्भर भारताची योजना अधिकच भक्कम बनत चालली आहे, असे संरक्षणमंत्री पुढे म्हणाले. स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतमुळे देशाच्या सागरी सुरक्षेचे बळ प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचा विश्वास राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला.

मात्र भारतीय नौदलाचे हे वाढते सामर्थ्य कुणाला चिथावणी देण्यासाठी नसून संरक्षणासाठीच आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील शांततेची हमी देशाचे हे नौदलसामर्थ्य देत असल्याचा दावा संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. भारतीय नौदलाने कुठल्याही धोक्याचा सामना करण्यासाठी सज्जता कायम ठेवल्याचे सांगून यासाठीही संरक्षणमंत्र्यांनी नौदलाची प्रशंसा केली. भारतीय नौदलाकडून सागरी सुरक्षेसाठी ‘प्रोजेक्ट सी बर्ड’ नावाचा विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचीही संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांन पाहणी केली.

भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करीत असून त्याच प्रमाणात भारताचा व्यापार व सागरी मालवाहतुकीचा विस्तार होत आहे. अशा परिस्थितीत देशाचे सागरी हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात सतत वाढ करणे अनिवार्य बनले आहे. त्यातच भारताच्या सागरी प्रभावक्षेत्रात घुसून आव्हान देण्यासाठी चीन धडपडत आहे. अशा परिस्थितीत भारताने आपल्या नौदलाचे सामर्थ्य व क्षमता वाढविण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम राबविला असून त्याचा प्रभाव देखील दिसू लागला आहे. संरक्षणमंत्र्यांच्या विधानातूनही ही बाब ध्वनीत होत आहे.

leave a reply