रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल

-विख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांचा इशारा

डॅव्होस – युक्रेनच्या युद्धाची व्याप्ती वाढली, तर त्याने तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला होता. रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे प्रमुख निकोलाय पत्रुशेव्ह यांनीही तिसऱ्या महायुद्धाचा धोका बळावल्याचे पाश्चिमात्य देशांना बजावले होते. पण आता धनाढ्य गुंतवणूकदार म्हणून ख्यातनाम असलेले जॉर्जस सोरस यांनीही युक्रेनवर रशियाने केलेले आक्रमण म्हणजे तिसऱ्या महायुद्धाचा आरंभ असू शकतो, असे बजावले आहे. इतकेच नाही तर या युद्धामुळे मानवी सभ्यता नष्ट होण्याचा धोका असल्याची चिंता सोरोस यांनी व्यक्त केली.

soros-putinस्वित्झर्लंडच्या डॅव्होस येथे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत बोलताना जॉर्ज सोरस यांनी तिसऱ्या महायुद्धाचा धोका अधोरेखित केला. युक्रेनवर रशियाने चढविलेल्या हल्ल्यामुळे युरोप खंड मूळापासून हादरला आहे. त्यामुळे हे युद्ध रोखण्यासाठी आपले सारे स्त्रोत पूर्णपणे वापरण्याची तयारी ठेवायला हवी. मानवी सभ्यतेचे रक्षण करायचे असेल, तर लवकरात लवकर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा पराभव करणे भाग आहे. यासाठी युक्रेनला अमेरिका आणि युरोपिय देशांनी केलेल्या लष्करी व आर्थिक सहाय्याची सोरोस यांनी प्रशंसा केली. मात्र युरोपिय देशांचे रशियन इंधनावरील अवलंबित्त्व ही फार मोठी समस्या बनलेली आहे, अशी खंत सोरोस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी जर्मनी व रशियामध्ये इंधनवाहिनी जोडून यासाठी रशियाशी विशेष करार केला होता. यामुळे युरोपिय देशांचे रशियन इंधनावरील अवलंबित्त्व वाढले आहे, असे सांगून सोरोस यांनी यासाठी मर्केल यांच्यावर ठपका ठेवला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चलाख असून ते युरोपिय देशांना ब्लॅकमेल करीत आहेत. युरोपिय देशांचा इंधनपुरवठा रोखण्याच्या धमक्या देऊन याचे भयंकर परिणाम सहन करावे लागतील, असे पुतिन युरोपिय देशांना धमकावत आहेत. रशियाने युरोपचा इंधनपुरवठा रोखला तर जितके मोठे परिणाम होणार नाहीत, त्यापेक्षाही भीषण परिणाम होतील, असे युरोपिय देशांना पटवून देण्यात पुतिन यशस्वी ठरले आहेत, असा दावा जॉर्ज सोरस यांनी केला.

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गेल्या वर्षी धुर्तपणे इंधनाची निर्यात न करता, त्याचा साठा केला. यामुळे युरोपात इंधनाची टंचाई निर्माण झालीआहे. याचा लाभ रशियालाच मिळत असून इंधनाच्या दरवाढीमुळे रशिया अधिक पैसे कमावत असल्याचे सोरस यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत रशियाला गुडघ्यावर आणायचे असेल, तर रशियाच्या इंधन निर्यातीवर जबर कर लादावा लागेल, असा सल्ला सोरस यांनी युरोपिय देशांना दिला. दरम्यान, रशियाचा युक्रेनवरील हल्ला ही काही आकस्मिक बाब ठरत नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्याच्या आधी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना त्याची कल्पना दिली होती, असे सांगून सोरस यांनी जिनपिंग यांच्यावरही टीका केली आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाच्या साथीवरील लसी प्रभावी नाहीत, हे डर्टी सिक्रेट चिनी जनतेला कळू दिले नाही, असा आरोप सोरस यांनी केला आहे.

रशिया व चीनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये बरेच साम्य असून दोन्ही नेते आपली दहशत माजवून कारभार करतात, असे सोरस पुढे म्हणाले. राष्ट्राध्क्ष जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीचे चिनी अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असून जगातील दुसऱ्या क्रमांकाची ही अर्थव्यवस्था कोसळत आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळी कोलमडेल आणि त्यामुळे महागाई भडकून जागतिक मंदी येण्याचा धोका बळावला आहे, असा इशारा जॉर्ज सोरस यांनी दिला.

दरम्यान, सोरस हे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे टीकाकार आहेत. लोकशाही व उदारमतवादी धोरणांचा पुरस्कार करणारे धनाढ्य गुंतवणूकदार अशी त्यांची ओळख आहे. पण आपल्या प्रभावाचा वापर करून जॉर्ज सोरस दुसऱ्या देशात हस्तक्षेप करीत असल्याचे गंभीर आरोप काही युरोपिय देशांमधून झाले होते. हंगेरीच्या सरकारने तर ‘स्टॉप सोरस लॉ’ नावाचा कायदा आपल्या संसदेत संमत करून घेतला होता. हंगेरीत घुसणाऱ्या निर्वासितांना सहाय्य करणाऱ्या व्यक्ती आणि गटाना रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. त्यामुळे युरोपिय देशांमध्ये जॉर्ज सोरस यांच्याबाबत परस्परविरोधी भूमिका मांडली जात असल्याचे दिसते.

leave a reply