इम्रान खान यांचे पाकिस्तानच्या लष्करावर जोरदार टीकास्त्र

इस्लामाबाद – पाकिस्तानची जनता म्हणजे कुठेही हाकलता येण्याजोग्या शेळ्यामेंढ्या नाही, असे सांगून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याच देशाच्या लष्करावर तोफ डागली. लाहोरपासून सुरू झालेला इम्रान खान यांचा लाँग मार्च राजधानी इस्लामाबादमध्ये धडक मारण्यासाठी निघाला आहे. याच्या दुसऱ्या दिवशीही इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्करावर गंभीर आरोप केले. तर इम्रान खान यांनी केलेल्या आरोपांना पाकिस्तानपेक्षा भारतीय माध्यमांमध्येच अधिक प्रसिद्ध मिळत आहे, त्यांनी या प्रसिद्धीचा आनंद घ्यावा, असा टोला पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी लगावला. यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात पुन्हा एकदा भारताचा वापर केला जात असल्याचे दिसते आहे.

Imran-Khanपाकिस्तानचे लष्करच एकेकाळी नवाझ शरीफ यांना चोर म्हणत होते. तर असिफ अली झरदारी यांचा उल्लेख मिस्टर टेन पर्सेंट असा केला जात होता. आज हे दोन्ही भ्रष्ट नेते स्वच्छ बनले आहेत का? असा प्रश्न करून इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्कराची कोंडी केली. अशारितीने घुमजाव करून पाकिस्तानचे लष्कर देशाच्या जनतेला शेळ्यामेंढ्यांप्रमाणे एकीकडून दुसरीकडे नेत आहेत. पण पाकिस्तानची जनता म्हणजे शेळ्यामेंढ्या नाही, तर स्वतंत्र आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपण लाँग मार्च आयोजित केल्याचे इम्रान खान म्हणाले.

तसेच आपल्या पक्षाच्या नेत्यांना व आपले समर्थन करणाऱ्या पत्रकारांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले व त्यांना मारहाण झाल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला. तसेच आपल्याला पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांच्याबद्दल बरेच काही ठाऊक आहे, पण ही माहिती उघड करून मला देशाचे नुकसान करायचे नाही, असे इम्रान खान पुढे म्हणाले. दरम्यान, इम्रान खान बेजबाबदारपणे पाकिस्तानच्या लष्करावर टीका करीत असून त्यांना देशात विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी केला. सध्या भारतीय माध्यमे इम्रान खान यांना प्रसिद्ध देत आहेत, त्याचा त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला संरक्षणमंत्री असिफ यांनी लगावला.

तर पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगझेब यांनीही भारतीय माध्यमांकडून इम्रान खान यांना वारेमाप प्रसिद्धी दिली जात असल्याची टीका केली. मात्र पाकिस्तानचे मंत्री अशारितीने इम्रान खान यांच्यावर टीका करीत असले, तरी त्यांच्या लाँग मार्चमुळे पाकिस्तानात सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले तरुण इस्लामाबादमध्ये धडक मारल्यानंतर किंवा त्याच्याही आधी हिंसक कारवाया करू शकतात. तसेच पोलीस दल व लष्कराच्या लाँग मार्चवरील कारवाईनंतरही परिस्थिती चिघळू शकते. यामुळे पाकिस्तानचे सरकार व लष्करासमोर नवा पेच उभा राहिला आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये अराजक माजविण्याची संधी इम्रान खान यांना मिळणार नाही. त्यांच्या लाँग मार्चवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्ला यांनी याआधीच दिला होता.

leave a reply