शेअरबाजारातील घसरणीसह महागाई व व्याजदरवाढीमुळे जगातील सर्वाधिक धनाढ्य उद्योजकांना 500 अब्ज डॉलर्सचा फटका

Inflationवॉशिंग्टन – शेअरबाजारात सातत्याने होणारी घसरण, महागाई व व्याजदरातील वाढींचा फटका जगातील सर्वाधिक धनाढ्य म्हणून ओळखण्यात येणाऱ्या उद्योजकांना बसला आहे. जगातील आघाडीच्या उद्योजकांपैकी 20 प्रमुख उद्योजकांना गेल्या 10 महिन्यात तब्बल 500 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्स’द्वारे ही माहिती देण्यात आली. सर्वाधिक फटका बसलेल्या उद्योजकांमध्ये फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांच्यासह एलॉन मस्क, जेफ बेझॉस, बिल गेट्स व जॅक मा यांचा समावेश आहे.

stock-Marketकोरोनाची साथ व त्यापाठोपाठ सुरू झालेल्या रशिया-युक्रेन संघर्षामुळे जागतिक स्तरावर महागाईचा प्रचंड भडका उडाला आहे. महागाई रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात वाढ करण्यात येत आहे. महागाई व व्याजदरातील वाढीचा परिणाम लोकांच्या क्रयशक्तीवर होत असून जागतिक स्तरावरील उत्पादनांची मागणी कमी होताना दिसत आहे. अमेरिकेसह अनेक आघाडीच्या देशांच्या विकासदरातही घसरण होत असून वर्ल्ड बँकेसह अनेक वित्तसंस्थांनी जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असल्याचे बजावले आहे.

या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता असून त्यांनी शेअरबाजारात सातत्याने विक्रीचा मारा चालविला आहे. रशिया-युक्रेन संघर्षाला सुरुवात झाल्यापासून हे प्रमाण वाढले असून जगातील अनेक आघाडीच्या शेअरनिर्देशांकात 10 ते 30 टक्क्यांची घसरण झाली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा प्रमुख शेअर निर्देशांक म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘नॅस्डॅक’मध्ये या वर्षात तब्बल 29 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे आर्थिक निकाल नकारात्मक येत असल्याने गुंतवणूकदारांकडून तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची विक्री करण्यात येत आहे. त्याचा परिणाम या कंपन्यांचे प्रमुख असणाऱ्या धनाढ्य उद्योजकांवरही दिसून आला आहे.

stock marketफेसबुकचे (मेटा प्लॅटफॉर्म्स इंक.) प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना या वर्षात सर्वाधिक फटका बसल्याचे समोर आले. काही महिन्यांपूर्वीच झुकरबर्ग यांनी ‘मेटाव्हर्स’ नावाचा नवा उपक्रम जगासमोर सादर केला होता. ‘व्हर्च्युअल वर्ल्ड’ असे स्वरुप असलेल्या या उपक्रमासाठी त्यांनी जवळपास 70 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याला विशेष यश मिळाले नसून फेसबुकसह इतर सोशल मीडियाचे युजर्सही घटत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘मेटा’च्या महसुलात सलग दोन तिमाहींमध्ये घसरण झाली असून समभागांचे मूल्यही घटले आहे. या घसरणीमुळे वर्षभरात झुकरबर्ग यांना तब्बल 100 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

झुकरबर्ग यांच्यापाठोपाठ ‘ट्विटर’वर ताबा मिळविणाऱ्या एलॉन मस्क यांचे वर्षभरात 58 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तर ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या संपत्तीतही 55 अब्ज डॉलर्सहून अधिक घट नोंदविण्यात आली. ॲमेझॉनच्या समभागांचे मूल्य यावर्षी जवळपास 40 टक्क्यांनी घसरले असून त्याचा फटका बेझॉस यांना बसल्याचे दिसून आले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांच्या संपत्तीतही वर्षभरात 28 अब्ज डॉलर्सची घसरण झाली. चीनमधील आघाडीचे उद्योजक जॅक मा यांना नऊ अब्ज डॉलर्सचा तर जगातील आघाडीचे गुंतवणूकदार असलेल्या वॉरेन बफे यांना साडेसात अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर 2020 व 2021मध्ये उद्योजकांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. मात्र त्यानंतर या वर्षात झालेली मोठी घट लक्ष वेधून घेणारी ठरली असून ही बाब आर्थिक मंदीचे संकेत असल्याचा दावा ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वेबसाईटने केला आहे.

leave a reply