अफगाणिस्तानात तालिबान, अल कायदा आणि ‘जैश’ची एकजूट

काबुल – अफगाणिस्तानात तालिबान व अल कायदाबरोबर पाकिस्तान पुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने हातमिळवणी केली आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील सीमेजवळ ‘जैश’ने तालिबान व अल कायदासह तळ ठोकले असून गेल्या काही दिवसांपासून नांगरहार, कुनार प्रांतात अफगाणी जवानांवर झालेल्या हल्ल्यांसाठी या दहशतवादी संघटनांचे त्रिकूट जबाबदार असल्याचा आरोप अफगाणी सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला आहे. तर या दहशतवाद्यांकडे प्रगत शस्त्रांचा साठा असल्याचे उघड झाले आहे.

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले कमांडर ‘जनरल अयुब हुसेनखेल’ यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना दहशतवादी संघटनांच्या हातमिळवणीची माहिती दिली. पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या नांगरहार, कुनार, नुरीस्तान या अफगाणी प्रांतात तालिबान आणि अल-कायदा व जैश या संघटनांनी तळ ठोकला आहे. अफगाणी जवानांवर हल्ले चढविणे हे या दहशतवादी संघटनांचे लक्ष्य असून गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणी सैनिकांवरील वाढत्या हल्ल्यांमागे देखील हे त्रिकूट असल्याची माहिती जनरल हुसेनखेल यांनी दिली. या काळात अफगाणी जवानांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे जनरल हुसेनखेल यांनी सांगितले.

अफगाणी जवान हे दहशतवादी हल्ले उधळून लावत आहेत. या हल्ल्यांमध्ये मारले गेलेले व अटक करण्यात आलेले दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे अफगाणी लष्कराच्या कमांडरने जाहीर केले. यातील काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील तर काही दहशतवादी पाकिस्तानच्या आफ्रिदी टोळीतील असल्याची माहिती समोर आली आहे. तर तालिबानच्या दहशतवाद्यांकडे सापडलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे अफगाणी सुरक्षा यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. हा शस्त्रसाठा पाकिस्तानी लष्कराने पुरविल्याचा आरोप अफगाणी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्याचबरोबर ‘जैश’सह तालिबान व अल कायदाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण मिळाल्याचा दावाही अफगाणी लष्करी अधिकारी करीत आहेत.

तालिबानने ‘जैश’बरोबरच्या सहकार्याचा इन्कार केला आहे. पण पाकिस्तानातील या संघटनेचे ४०० हून अधिक दहशतवादी अफगाणिस्तानात तळ ठोकून असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच उघड झाली होती. जैश’चे दहशतवादी तालिबान आणि अल कायदाच्या साथीने भारतात हल्ले घडविण्याच्या तयारीत असल्याचा इशारा अफगाणी गुप्तचर यंत्रणांनी याआधी दिला होता.

leave a reply