भारताने १२० देशांना औषधांचा पुरवठा केला – वाणिज्यमंत्री पियूष गोयल

नवी दिल्ली – भारताने ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या संकल्पनेनुसार कोरोनाव्हायरसच्या साथीत आतापर्यंत जवळपास १२० देशांना औषधांचा पुरवठा केला आहे. भारताची ओळख आता ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ अशी बनली आहे. इतकेच नाही तर भारत आताच्या घडीला दररोज दोन लाख पीपीई किट्सची निर्मिती करीत असल्याचे वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी ‘जी-२०’ देशांना अभिमानाने सांगितले. गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ‘जी-२०’ सदस्य देशांच्या वाणिज्य मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी वाणिज्यमंत्री गोयल यांनी भारत कोरोनाव्हायरसच्या विरोधात करीत असलेल्या लढ्यांची माहिती दिली.

‘जी-२०’ देशांच्या बैठकीत प्रामुख्याने कोरोनाव्हायरसवर चर्चा पार पडली. ‘जी-२०’च्या सदस्य देशांनी अत्यावश्यके औषधे, उपचार आणि लस परवडणारी असेल, यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत असे आवाहन पियूष गोयल यांनी यावेळी केले. तसेच सीमेपलीकडे अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी अनावश्यक व्यापारी अडथळे येतात, ते लवकरात लवकर दूर व्हावेत, अशी अपेक्षा गोयल यांनी यावेळी व्यक्त केली. या बैठकीत भारतासह इतर सदस्य देशांनी काही मुद्दे मांडले. तसेच ‘जी-२०’ सदस्य देशांमधील व्यापार आणि सहकार्यावर देखील यावेळी चर्चा पार पडली.

दरम्यान, भारताला मिळालेल्या इर्मजन्सी फंडचा वापर भारताने शेजारी देशांना औषधे आणि वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करण्यासाठी केल्याची माहिती गोयल यांनी यावेळी दिली. तसेच या साथीमुळे जगभरात तज्ज्ञ, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना व्हिसाच्या अडचणी झाल्या आहेत. त्यांच्या समस्या सोडण्यावर भर द्यायला हवे, असे आवाहन गोयल यांनी यावेळी केले.

leave a reply