भारत सागरी शक्ती म्हणून उदयाला येत आहे

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – ‘भारत सागरी शक्ती म्हणून उदयाला येत आहे आणि आपल्या देशाचा भरभराट सागरावर अवलंबून आहे’, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. शुक्रवारी संरक्षणमंत्र्यानी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भारताच्या तटरक्षक दलाचे गस्ती जहाज आणि दोन इंटरस्पेटर बोटींचे जलावतरण केले. यांच्या समावेशामुळे भारताच्या तटरक्षक दलाचे सामर्थ्य वाढेल, असा विश्वास यावेळी संरक्षणमंत्र्यानी व्यक्त केला.

शुक्रवारी तटरक्षक दलाचे गस्ती जहाज ‘सचेत’चे जलावतरण पार पडले. हे स्वदेशी बनावटीचे जहाज असून गोव्याच्या शिपयार्डमध्ये याची निर्मिती झाली. दोन हजार तीन टन वजनाचे हे जहाज आधुनिक यंत्रणांनी सुसज्ज आहे. तर ‘सी- ४५०’ आणि ‘सी-४५१’ या इंटरस्पेटर बोटी गुजरातच्या शिपयार्डमध्ये विकसित करण्यात आल्या आहेत. या बोटींमध्येही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. हे जहाज आणि बोटी संवेदनशील क्षेत्रात गस्त घालून देशाची सागरी सुरक्षा अधिकच भक्कम करतील.

देशाला सागरी दहशतवादाचा धोका संभवतो. गेल्या काही महिन्यांमध्ये सागरी मार्गाने अंमली पदार्थांचा अवैध व्यापार आणि स्मगलिंगचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तटरक्षक दलासमोरचे आव्हान वाढले आहे. जहाज आणि बोटींच्या समावेशामुळे तटरक्षक दलाच्या सामर्थ्यात वाढ होईल, असे संरक्षणमंत्र्यानी स्पष्ट केले. तसेच देशातच जहाज आणि बोटी तयार होत असल्याने शिपयार्डच्या क्षमतेत वाढ होत असल्याचे सांगून संरक्षणमंत्र्यानी त्यावर समाधान व्यक्त केले. आताच्या घडीला तटरक्षक दलाच्या ताफ्यात १५० जहाजे आणि बोटी तर ४० विमाने आहेत. तर देशातल्या विविध शिपयार्डमध्ये तटरक्षक दलासाठी ४० जहाजांची निर्मिती सुरू आहे.

२६/११चा दहशतवादी हल्ला चढविणारे दहशतवादी पाकिस्तानातून सागरी मार्गानेच मुंबईत दाखल झाले. त्यानंतरच्या काळातही सागरी मार्गाने भारतात दहशतवादी घुसवून घातपात माजविण्याचे कारस्थान पाकिस्तानने आखले असल्याचे उघड झाले होते. यामुळे देशाच्या सागरी सीमेची सुरक्षा व तटरक्षक दलाचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे. म्हणूनच केंद्र सरकारने तटरक्षक दलाची क्षमता वाढविण्यासाठी योजनाबद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली होती. यानुसार तटरक्षक दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक गस्ती नौका व इतर आवश्यक साहित्य सहभागी करून घेतले जात आहे.

leave a reply