एनईपीमुळे भारत महान आर्थिक महासत्ता बनेल

ऑस्ट्रेलियाच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली – २०३५ सालात जगात पदवी घेणाऱ्या चारपैकी एकजण भारतीय विद्यापीठातून आलेला असेल. भारताने स्वीकारलेल्या राष्ट्रीय शिक्षा धोरणामुळे (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी-एनईपी) लवकरच हा देश महान आर्थिक महासत्ता बनेल, असा दावा ऑस्ट्रेलियाचे शिक्षणमंत्री जेसन क्लेअर यांनी केला. एनईपीमुळे भारताचा कायापालट होईल, यामुळे भारताच्या युवापिढीचे कौशल्य वाढेल, असा विश्वास क्लेअर यांनी व्यक्त केला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या व्यंकटेश्वरा कॉलेज व केंद्रीय विद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना ऑस्ट्रेलियाच्या शिक्षणमंत्र्यांनी ही प्रशंसा केली.

great economic superpowerऑस्ट्रेलिया हा आज दिसतो आहे, त्यापेक्षा ५० वर्षांपूर्वी फारच वेगळा देश होता. शिक्षणक्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे ऑस्ट्रेलियाला हा विकास साधता आला. पण आधीच्या काळात कित्येक ऑस्ट्रेलियन्सनी दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतलेले आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री क्लेअर यांनी दिली. तसेच या विद्यापीठात शिक्षण घेतलेले कितीतरी ऑस्ट्रेलियन्स जगभरात कमाल करून दाखवित आहेत, याचाही दाखला या देशाच्या शिक्षणमंत्र्यांनी दिला. ही सारी माहिती देत असताना क्लेअर यांनी भारताने हाती घेतलेल्या एनईपीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. २०३५ सालात जगात पदवी घेणाऱ्या चारपैकी एक जण भारतीय विद्यापीठातून पदवी घेणारा असेल, असा दावा यावेळी क्लेअर यांनी केला. याबरोबरच भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या महत्त्वाच्या सामंजस्य करारांची माहिती यावेळी शिक्षणमंत्री जेसन क्लेअर यांनी दिली. शिक्षणक्षेत्रातील हे सामंजस्य करार म्हणजे पुढच्या काळात दोन्ही देशांमध्ये विकसित होणाऱ्या सहकार्याची पायाभरणी ठरते, असेही पुढे क्लेअर म्हणाले.

leave a reply