इस्रायलवरील हल्ल्यांना जबाबदार असलेल्या इराणबरोबर अमेरिकेने वाटाघाटी करू नये – अमेरिकन सिनेटर्सची जोरदार मागणी

वॉशिंग्टन – गाझापट्टीतील हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांना इराणचे उघड समर्थन आहे. इराणचे सहाय्य आणि चिथावणीमुळेच या दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर शेकडो रॉकेट हल्ले चढविले. अशा परिस्थितीत, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांचे ठामपणे समर्थन करावे आणि इस्रायलवरील हल्ल्यांसाठी जबाबदार असणार्‍या इराणबरोबरील वाटाघाटीतून त्वरीत माघार घ्यावी’, अशी मागणी अमेरिकेच्या आघाडीच्या सिनेटर्सनी केली. या मागणीला अमेरिकी माध्यमातूनही प्रतिसाद मिळत आहे. इस्रायलच्या विनाशासाठी प्रयत्न करणार्‍या इराणला सवलती देण्यासाठी बायडेन प्रशासन का पुढाकार घेत आहे? असा सवाल अमेरिकी माध्यमे विचारीत आहेत.

इराणबरोबर वाटाघाटीगेल्या काही दिवसांपासून गाझापट्टीतून इस्रायलवर शेकडो रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले आहेत. अमेरिकेने १९९७ साली दहशतवादी संघटना जाहीर केलेली हमास हे हल्ले चढवित आहेत. इराणकडून हमासला आर्थिक तसेच लष्करी सहाय्य मिळत असल्याचा आरोप अमेरिकेच्या आधीच्या प्रशासनांनी केला होता. अशा परिस्थितीत, बायडेन प्रशासनाने व्हिएन्ना येथे इराणबरोबर सुरू केलेल्या वाटाघाटी त्वरीत थांबवाव्या, अशी मागणी अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या ४४ सिनेटर्सनी पत्राद्वारे केली आहे. यामध्ये टेड क्रूझ, मार्को रुबियो, टॉड यंग, टॉम कॉटन, रिक स्कॉट, डॅन सुलिवन, मिट रूम्नी, जॉन केनेडी अशा वरिष्ठ सिनेटर्सचा समावेश आहे.

या पत्राद्वारे रिपब्लिकन सिनेटर्सनी इराणवर जोरदार टीका केली. ‘इराणकडून पैसा मिळालेले गाझातील दहशतवादी इस्रायलवर रॉकेट्सचा वर्षाव करीत आहेत. इस्रायली जनता, शहरे इतकेच नाही तर इस्रायलची राजधानी जेरूसलेमला या दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. हमासने इस्रायलवर चढविलेल्या या हल्ल्यांसाठी अमेरिकेने इराणला जबाबदार धरावे आणि कुठल्याही परिस्थितीत, इराणला निर्बंधातून सवलत देऊ नये’, असे आवाहन या सिनेटर्सनी केले. २०१४ सालानंतर पहिल्यांदा जेरूसलेमजवळ रॉकेट्स धडकल्याची आठवण या सिनेटर्सनी करून दिली. त्याचबरोबर हमासच्या या रॉकेट हल्ल्याच्या काही दिवस आधी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या चिथावणीकडेही या सिनेटर्सनी लक्ष वेधले.

इराणबरोबर वाटाघाटी‘इस्रायलच्या सुरक्षेबाबत असलेली आपली वचनबद्धता दाखवून देण्यासाठी आणि अमेरिकेच्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी, बायडेन प्रशासनाने इराणबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटी त्वरीत थांबवाव्या. तसेच कुठल्याही प्रकारे निर्बंधातून सवलत मिळणार नाही, हे इराणला ठणकावून सांगावे’, असे या सिनेटर्सनी फटकारले. त्याचबरोबर इराण हा इस्रायलचा शत्रूदेश असून अणुकराराबाबतच्या वाटाघाटी आणि सवलती या शत्रूदेशाला समृद्ध करणार्‍या ठरतील, असे रिपब्लिकन सिनेटर्सनी बजावले.

४४ सिनेटर्सचे हे पत्र बायडेन प्रशासनावर दडपण वाढविणारे असल्याचा दावा केला जातो. अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने बायडेन प्रशासनावर टीका केली आहे. अमेरिकेने याआधी इराणला दहशतवादाचा सर्वात मोठा प्रायोजक देश ठरविले आहे. याच इराणने इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा दिल्या आहेत. पण याच इराणला कठोर निर्बंधातून मुक्त करण्यासाठी बायडेन प्रशासन का प्रयत्न करीत आहे? असा प्रश्‍न अमेरिकेतील वृत्तवाहिनीने केला आहे.

अमेरिकेने इराणला निर्बंधातून मुक्त केले आणि पॅलेस्टिनींना आर्थिक सहाय्य पुरविले तर ते गाझातील हमास या दहशतवादी संघटनेकडेच जाईल व ते पुन्हा इस्रायलवर हल्ले चढवतील, याकडे अमेरिकी वृत्तवाहिन्या लक्ष वेधत आहेत.

leave a reply