सवलतीच्या दरात इंधनाचा रशियाने दिलेला प्रस्ताव भारताने स्वीकारला

नवी दिल्ली – अमेरिकेने रशियाच्या इंधन निर्यातीला लक्ष्य करणारे कठोर निर्णय जाहीर केल्यानंतर, रशियाने विश्‍वासू मित्रदेश असलेल्या भारताला सवलतीच्या दरातील इंधनाचा प्रस्ताव दिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कडाडलेले असताना, भारताने या प्रस्तावावर विचार सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण भारताची सर्वात मोठी इंधन कंपनी ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन-आयओसी’ने रशियाकडून सुमारे ३० लाख बॅरल्स इतक्या इंधनतेलाची खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात बातम्या येत असताना, भारताचा रशियाबरोबरील हा व्यवहार अमेरिकी निर्बंधांच्या कचाट्यात येत नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. पण इतिहासात याची नोंद होईल, असा इशारा अमेरिकेने भारताला दिला आहे.

रशियाने दिलेला प्रस्तावकाही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यापुढे अमेरिका रशियाकडून इंधनाची खरेदी करणार नाही, असा निर्णय घोषित केला. इतर देशांनीही रशियन इंधनाबाबत तसा निर्णय घ्यावा, अशी आपली अपेक्षा असल्याचे बायडेन म्हणाले होते. यामुळे रशियन अर्थव्यवस्थेला फटका बसेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला होता. पण इंधनासाठी रशियावर अवलंबून असलेल्या देशांना एकाएकी तसा निर्णय घेता येणार नाही, याची आपल्याला कल्पना असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते.

अमेरिकेच्या पाठोपाठ ब्रिटन तसेच इतर काही मित्रदेशांनीही रशियाच्या इंधन निर्यातीला लक्ष्य करणारे निर्णय घेतले. इंधनाच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या रशियन अर्थव्यवस्थेवर याचे विघातक परिणाम होऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर, रशियाने भारताला सवलतीच्या दरात इंधन पुरविण्याचा प्रस्ताव दिला होता. इतकेच नाही तर रशियाच्या इंधनक्षेत्रात गुंतवणूक करून भारताने इंधनाचा पुरवठा अधिक सुनिश्‍चित करावा, असा प्रस्ताव रशियाने दिला आहे. भारत रशियाकडून देण्यात आलेल्या या प्रस्तावावर विचार करीत असल्याचे इंधनमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले होते.

रशियाने दिलेला प्रस्तावदरम्यान, आयओसीने रशियाकडून बॅरलमागे २० ते २५ डॉलर्स इतक्या मोठ्या सवलतीच्या दरात सुमारे ३० लाख बॅरल्स इतक्या खरेदी केलेली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मागणीच्या ८५ टक्के इतक्या प्रमाणात इंधनाची आयात करणारा भारत आपल्या इंधनविषयक गरजांसाठी कुणाचीही पर्वा न करता निर्णय घेऊ शकतो, असे विश्‍लेषक सांगत आहेत.

भारत व रशियाच्या या व्यवहाराकडे आपली बारीक नजर असल्याचा संदेश अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी पत्रकार परिषदेत भारताचा रशियाबरोबरील इंधन व्यवहार अमेरिकी निर्बंधांच्या कक्षेत येत नसल्याचे म्हटले आहे. पण दुसर्‍या देशावर हल्ला चढविणार्‍या रशियाकडून सवलतीच्या दरात भारताने इंधनाची खरेदी केली, याची नोंद इतिहासात होईल, असे सांगून भारताचा हा निर्णय चुकीचा असल्याचे संकेत जेन साकी यांनी दिले आहेत. इतिहास नाही, तर अमेरिका भारताच्या या निर्णयाची नोंद घेत आहे व याचे परिणाम संभवतात, असे साकी यांना भारताला सांगायचे आहे.

leave a reply