उत्तर कोरियाच्या ‘मॉंस्टर’ क्षेपणास्त्राची चाचणी अपयशी

सेऊल – बुधवारी उत्तर कोरियाने सुनान तळावरुन अमेरिकेच्या कुठल्याही भागात एकाचवेळी अनेक हल्ले चढविण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. मात्र ‘हॅसॉंग-१७’ नाव असलेल्या या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपणानंतर अवघ्या काही सेकंदात स्फोट होऊन ठिकर्‍या उडाल्या. या अपयशी चाचणीच्या पार्श्‍वभूमीवर, उत्तर कोरियाने गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधित केलेल्या इतर क्षेपणास्त्र चाचण्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

‘मॉंस्टर’उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन ‘हॅसॉंग-१७’ या क्षेपणास्त्राचा उल्लेख ‘मॉंस्टर’ असा करतात. २०२० सालच्या ऑक्टोबर महिन्यात उत्तर कोरियाने लष्करी संचलनात पहिल्यांदा हे क्षेपणास्त्र जगासमोर आणले होते. सुमारे नऊ हजार मैल (१५ हजार किलोमीटर) अंतरावर अनेक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात असल्याचा दावा उत्तर कोरिया करीत आहे. अमेरिकेच्या अतिपूर्वेकडील शहरे देखील आपल्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असल्याचा इशारा उत्तर कोरियाने याआधी दिला होता.

अशा या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चाचणी घेण्यात आली. पण प्रक्षेपणानंतर पुढच्या काही सेकंदात सदर क्षेपणास्त्राचे हवेतच तुकडे झाले. राजधानी प्योंगयांगजवळ या क्षेपणास्त्राचे तुकडे कोसळल्याचा दावा केला जातो. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांच्यासाठी ही सर्वात अपमानास्पद बाब असल्याचा दावा दक्षिण कोरियाचे लष्कर करीत आहे. पण १५ एप्रिलपर्यंत उत्तर कोरिया आणखी एक किंवा दोन क्षेपणास्त्रांची चाचणी करील, असा दावा दक्षिण कोरियातील लष्करी विश्‍लेषक करीत आहेत.

‘मॉंस्टर’उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांकडे दुर्लक्ष करणे अतिशय चुकीचे ठरेल, असा दावा दक्षिण कोरियातील विश्‍लेषक तसेच जपानची माध्यमे करीत आहेत. गेल्या अडीच महिन्यांमध्ये उत्तर कोरियाने नऊ क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. यामध्ये लघु ते दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्याचबरोबर उत्तर कोरियाने मोबाईल लॉंचर आणि पाणबुडीतूनही क्षेपणास्त्रांची चाचणी करून आपली लष्करी सज्जता दाखवून दिली, असा दावा दक्षिण कोरियन विश्‍लेषक करीत आहेत.

काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियामध्ये नवे सरकार सत्तेवर येत आहे. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष यून सुक योल हे चीन व उत्तर कोरियाबाबत आक्रमक भूमिका स्वीकारणारे नेते म्हणून ओळखले जातात. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जॉंग उन यांना रोखण्यासाठी पावले उचलण्याचा इशारा योल यांनी दिला होता. ‘उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे दक्षिण कोरियाची सुरक्षा धोक्यात येत असून अमेरिकेकडून अतिरिक्त थाड हवाई सुरक्षायंत्रणा खरेदी करून त्याची तैनाती करण्याची घोषणा योल यांनी केली होती.

leave a reply