रशियाला डिफॉल्टर बनविण्यासाठी पाश्‍चात्य देशांचे प्रयत्न

- रशियन अर्थमंत्र्यांचा आरोप

डिफॉल्टरमॉस्को/वॉशिंग्टन – रशियाने परदेशातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करु नये व हा देश कर्ज बुडविणारा डिफॉल्टर देश म्हणून घोषित व्हावा, यासाठी पाश्‍चिमात्य देशांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप रशियन अर्थमंत्र्यांनी केला आहे. मात्र रशिया अशा प्रयत्नांना बळी पडणार नसून रुबल या चलनात कर्जाची परतफेड करील, असे अर्थमंत्री अँतोन सिल्युनोव्ह यांनी बजावले. सध्या रशियन अर्थव्यवस्थेवर ४० अब्ज डॉलर्सचे परकीय कर्ज असून हे कर्ज डॉलर व युरो चलनातील आहे.

रशिया सरकार व बँक ऑफ रशियाची परदेशी चलनातील खाती गोठविण्यात आली आहेत. काही पाश्‍चिमात्य देशांची रशियाला जबरदस्तीने कर्जबुडवा देश बनविण्याची इच्छा असल्याने असे निर्बंध लादण्यात आले आहेत. या गोष्टींना कोणताही आर्थिक आधार नाही’, असा आरोप रशियाचे अर्थमंत्री अँतोन सिल्युनोव्ह यांनी केला. त्याचवेळी रशिया कर्जाची परतफेड करणार नाही, हा दावाही त्यांनी फेटाळून लावला. रशिया आपल्या रुबल चलनात कर्जाची परतफेड करण्यास तयार आहे, असे रशियन अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देश तसेच इतर मित्रदेशांनी रशियावर जबर आर्थिक निर्बंधांचा मारा सुरू ठेवला आहे. या निर्बंधांमुळे रशियाच्या परकीय गंगाजळीचा हिस्सा असलेला ३०० अब्ज डॉलर्सहून अधिक निधी रशियाला वापरता येणार नाही. त्याचवेळी अमेरिकेने रशियाला होणारा डॉलर्सचा पुरवठाही बंद केला असून युरोपिय महासंघानेही युरोतील व्यवहार बंद करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रशियन अर्थव्यवस्थेतील डॉलर व युरोचा साठा नगण्य झाला आहे. त्यामुळे परकीय कर्जाची परतफेड करण्यात रशियासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

डिफॉल्टरयापूर्वी १९९८ साली रशिया परकीय कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरला होता. त्याचे गंभीर परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत उमटले होते. मात्र यावेळी रशियाने कर्जाची परतफेड केली नाही तर त्याचा मोठा फटका बसणार नाही, असा दावा अर्थतज्ज्ञ तसेच वित्तसंस्थांनी केला.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे मूलभूत बदल होऊ शकतात, असा दावा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या नव्या अहवालात केला आहे. रशिया-युक्रेन युद्ध हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का असून त्याने आर्थिक विकासावर जबर परिणाम होतील, असे नाणेनिधीने बजावले आहे. महागाई भडकणार असून आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच पुरवठा साखळी बाधित होईल, असेे नाणेनिधीने म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर देताना रशियानेही नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. या निर्बंधांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन, संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन, गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी तसेच माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा समावेश आहे.

leave a reply