वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा देशवासियांना युक्रेन सोडण्याचा सल्ला

नवी दिल्ली – रशिया कुठल्याही क्षणी युक्रेनवर हल्ला चढविल, असे दावे अमेरिका, ब्रिटन करीत आहे. यामुळे युक्रेनमध्ये तणाव निर्माण झाला असून राजधानी किव्हमधील भारतीय दूतावासाने रविवारी आणखी एक ऍडव्हाझरी जारी केली. युक्रेनमध्ये वास्तव्य करीत असलेले भारतीय आणि शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आवश्यकता नसेल, तर युक्रेन सोडावे, असा सल्ला भारतीय दूतावासाने दिला. या सर्वांना मायदेशी आणण्यासाठी प्रवासी विमाने तसेच खाजगी विमानसेवा देखील पुरविण्यात येईल, असे दूतावासाने स्पष्ट केले.

वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा देशवासियांना युक्रेन सोडण्याचा सल्लागेल्या आठवड्याभरात पाश्‍चिमात्य देश दररोज रशिया युक्रेनवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचे दावे करीत आहेत. युक्रेनच्या पूर्वेकडील डोनेत्स्क व लुहान्स्क प्रांत किंवा राजधानी किव्ह रशियन लष्कराच्या हल्ल्याचे केंद्र ठरतील, असे या देशांचे म्हणणे आहे. त्यातच पूर्व युक्रेनमधील काही भागात स्फोट आणि गोळीबार झाल्याचे दावेही केले जात आहेत. याला अधिकृत स्तरावर पुष्टी मिळालेली नाही. पण यामुळे पूर्व युरोपात तणाव वाढला असून प्रत्येक देश आपल्या हितसंबंधांना युक्रेन सोडण्याचे आदेश देत आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी युक्रेनमधील घडामोडींवर आपली नजर असल्याचे जाहीर केले होते. तसेच या देशात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे म्हटले होते. गेल्या दोन दिवसात या भागातील तणाव वाढल्यानंतर किव्हमधील भारताच्या दूतावासाने विशेष ऍडव्हायझरी जारी केली. ‘युक्रेनमधील परिस्थितीमुळे वाढत असलेला तणाव आणि अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर, युक्रेनमध्ये वास्तव्य करीत असलेल्या सर्व भारतीयांनी आवश्यकता नसेल तर तात्पुरत्या काळासाठी युक्रेन सोडावा’, असे आवाहन भारतीय दूतावासाने केले.

युक्रेनमध्ये २० हजार भारतीय आहेत. यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍यांची सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांच्या कुटुंबियांना देखील युक्रेन सोडण्यात सांगण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

leave a reply