अमेरिकेकडून पोलंडबरोबरील सहा अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराला मंजुरी

वॉर्सा – रशिया-युक्रेन मुद्यावरून युरोपातील तणाव वाढत असतानाच अमेरिकेने पोलंडला अत्याधुनिक अब्राम्स रणगाडे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. पोलंड दौर्‍यावर असलेले अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी याची घोषणा केली. अमेरिकेच्या ‘डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने संसदेला यासंदर्भात माहिती दिली असून पोलंडला जवळपास २५० रणगाडे पुरविण्यात येणार आहेत.

अमेरिकेकडून पोलंडबरोबरील सहा अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराला मंजुरीअमेरिका व पोलंडमधील हा दुसरा मोठा संरक्षण करार ठरला आहे. यापूर्वी पोलंडने अमेरिकेकडून प्रगत ‘एफ-३५’ लढाऊ विमाने खरेदी करण्याबाबत करार केला होता. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत पोलंडमध्ये अमेरिकेचा कायमस्वरुपी संरक्षणतळ उभारण्याबाबतही चर्चा झाली होती.

अमेरिकी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलंडबरोबरील करारात २५० रणगाड्यांबरोबरच ‘काऊंटर इम्प्रोव्हाईज्ड् एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस सिस्टिम’, ‘कॉम्बॅट रिकव्हरी व्हेईकल्स’, ‘.५० कॅलिबर मशिन गन्स’ यांचाही समावेश आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत पोलंडला रणगाड्यांचा पुरवठा सुरू होईल, असे सांगण्यात येते.

यापूर्वी पोलंडने अमेरिकेकडून ‘पॅट्रिऑट’ क्षेपणास्त्रे तसेच ‘हायमार्स रॉकेट सिस्टिम’ खरेदी केली आहे. सध्या अमेरिकेचे साडेचार हजारांहून अधिक जवान पोलंडमध्ये तैनात आहेत. त्याव्यतिरिक्त अतिरिक्त चार हजार जवानांच्या तैनातीची तयारीही सुरू आहे. युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे पोलंडबरोबरील हे वाढते संरक्षण सहकार्य लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना त्यांच्या सीमेवर मजबूत नाटो नको आहे, पण पोलंडबरोबरील नवा करार नाटो अधिक बळकट करणारा ठरला आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिली आहे.

leave a reply