भारत व फिलिपाईन्स संरक्षण व सागरी क्षेत्रातील सहकार्य वाढविणार

नवी दिल्ली/मनिला – आपल्या नौदलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी करीत असलेल्या फिलिपाईन्सला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेली भेट लक्षवेधी ठरते आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या फिलिपाईन्स दौर्‍यात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्यासह उभय देशांनी इतर आघाड्यांवरही एकमेकांना सहाय्य करण्याचे मान्य केले आहे. चीनच्या वर्चस्ववादी कारवायांपासून फिलिपाईन्सला संभवणारा धोका लक्षात घेता, या देशाचे भारताबरोबरील हे सहकार्य धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते.

भारत व फिलिपाईन्स संरक्षण व सागरी क्षेत्रातील सहकार्य वाढविणारकाही दिवसांपूर्वीच फिलिपाईन्सने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदी संदर्भात करार केला होता. जवळपास ३८ कोटी डॉलर्स इतक्या रक्कमेचा हा करार फिलिपाईन्सच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे फिलिपाईन्सच्या नौदलाची क्षमता वाढविणारी ठरतील, असा विश्‍वास या देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर फिलिपाईन्सच्या लष्करालाही ब्रह्मोस क्षेपणास्त्रे हवी असल्याचे दावे केले जात होते. या पार्श्‍वभूमीवर, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची फिलिपाईन्स भेट विश्‍लेषकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती.

या भेटीचे सारे तपशील अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत. मात्र इंडो-पॅसिफिक क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्यावर भारत व फिलिपाईन्सचे एकमत झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चर्चेत उभय देशांमधील सहकार्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच दोन्ही देशांच्या सहकार्याची नवी दालने विकसित करण्याची तयारी परराष्ट्रमंत्र्यांनी या चर्चेत दाखविली. यामध्ये अंतराळ, सायबर सुरक्षा, सागरी क्षेत्राशी निगडीत अर्थव्यवस्था, अक्षय ऊर्जा आणि अर्थकारण आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय असलेल्या फिनटेक यांचा यामध्ये समावेश आहे.

भारत व फिलिपाईन्स संरक्षण व सागरी क्षेत्रातील सहकार्य वाढविणारयाबरोबरच परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री टिओडोरा एल. ब्लॉक्सिन ज्युनिअर यांच्यामध्ये क्षेत्रिय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींवरही विचारविनिमय झाला. याबरोबरच संरक्षण, अर्थकारण आणि कृषी क्षेत्राबाबत सहकार्य करण्यावर उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची सहमती झाली आहे.

भारताच्या फिलिपाईन्सबरोबरील या सहकार्याचे फार मोठे धोरणात्मक महत्त्व असून याकडे चीन अत्यंत बारकाईने पाहत आहे. केवळ फिलिपाईन्सच नाही तर व्हिएतना तसेच आग्नेय आशियाई क्षेत्रातील इतर देश देखील भारताबरोबरील आपले सहकार्य व्यापक करण्यासाठी उत्सूक आहेत. फिलिपाईन्सच्या पाठोपाठ व्हिएतनाम देखील भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी करण्याची तयारी करीत आहे. ही बाब भारताच्या शस्त्रविषयक निर्यातीसाठी ‘गेमचेंजर’ ठरेल, असा विश्‍वास नुकताच रिचर्ड हेडॅरियन या विश्‍लेषकाने व्यक्त केला होता.

leave a reply