भारत-अमेरिका दलाई लामा यांचा चीनविरोधात वापर करीत आहेत

- चीनच्या सरकारी मुखपत्राचा आरोप

बीजिंग – भारताच्या पंतप्रधानांनी दलाई लामा यांना त्यांच्या 86 व्या वाढदिवसाच्या फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनीही दलाई लामा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांनीही दलाई लामा यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. यानंतर चीनची काहिशी अनपेक्षित प्रतिक्रिया आली आहे. आधीच्या काळात दलाई लामा यांच्यावरून भारतासह अमेरिकेलाही इशारे देणार्‍या चीनने यावेळी मात्र सदर प्रकरणाला किंमत देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने दलाई लामा यांना महत्त्व देऊन भारत व अमेरिका चीनविरोधी डाव खेळत आहेत, पण त्याचा चीनवर परिणाम होणार नाही, असे बजावले आहे. पण चीनच्या लेखी या महत्त्व नसलेल्या गोष्टीवर चीनचे सरकारी मुखपत्राने प्रतिक्रिया नोंदवली, ही बाब लक्षवेधी ठरते.

भारत-अमेरिका दलाई लामा यांचा चीनविरोधात वापर करीत आहेत - चीनच्या सरकारी मुखपत्राचा आरोपपंतप्रधान मोदी यांनी दलाई लामा यांना दिलेल्या सदिच्छा म्हणजे चीनसाठी संदेश असल्याचे दावे भारतीय माध्यमांनी केले होते. चीनवर हुकूमशाही गाजविणार्‍या कम्युनिस्ट पक्षाला नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने भारताच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या नव्हत्या. अशा परिस्थितीत दलाई लामा यांना शुभेच्छा देऊन भारताच्या पंतप्रधानांनी चीनला स्पष्ट संकेत दिले, याची नोंद तिबेटींनी घेतली व यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. त्या पाठोपाठ अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दलाई लामा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ‘करूणा, समता आणि सर्वसामावेशकता यांचा संदेश देणारे दलाई लामा जगभरातील अनेकजणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतात’, अशा शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दलाई लामा यांची प्रशंसा केली. तिबेटींसह जगभरातील सर्वच जणांना समान अधिकार मिळावे, यासाठी आग्रह धरणार्‍या दलाई लामा यांच्याबद्दल मला अतिशय आदर वाटतो, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन पुढे म्हणाले.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील स्वतंत्र निवेदनात दलाई लामा यांना शुभेच्छा देऊन त्यांची प्रशंसा केली आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांनी देखील दलाई लामा यांच्याशी चर्चा केली. तिबेट व तैवान हे चीनसाठी अत्यंत संवेदनशील मुद्दे ठरतात. तिबेटवरील चीनचा अवैध ताबा आणि तिबेटींवरील चीनच्या अत्याचारांना दलाई लामा यांनी वेळोवेळी वाचा फोडली होती. त्यामुळे दलाई लामा यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारे महत्त्व म्हणजे चीनच्या विरोधात डाव असल्याचे आरोप चीनकडून केले जातात. विशेषतः भारत चीनच्या विरोधात तिबेट कार्डाचा वापर करीत असल्याची टीका चीनकडून अनेकवार करण्यात आली होती.

चीनच्या सरकारी मुखपत्राने भारत व अमेरिकेने दलाई लामा यांना महत्त्व देऊन चीनच्या विरोधात टुकार डावपेच वापरल्याचा शेरा मारला आहे. अशा डावपेचांचा चीनवर काहीच परिणाम होणार नाही, याला चीनने महत्त्व देण्याची गरज नाही, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. प्रत्यक्षात याची दखल घेऊन चीनच्या या सरकारी मुखपत्राने चीनला ही बाब चांगलीच झोंबल्याचे दाखवून दिले आहे. त्याचवेळी दलाई लामा यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल चीनकडून घेतली जातेच, हे ही या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या लेखातून उघड झाले आहे.

leave a reply