भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर नेणार

नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मुक्त व्यापारी करार संपन्न झाला आहे. मात्र दोन्ही देशांचे व्यापारी सहकार्य या कराराच्या पलिकडे जाऊन अधिक व्यापक करण्याचा निर्धार उभय देशांनी व्यक्त केला. यानुसार पुढच्या काळात भारत व ऑस्ट्रेलियामधील द्विपक्षीय व्यापार तब्बल 100 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे ध्येय दोन्ही देशांनी समोर ठेवले आहे. भारताचे व्यापारमंत्री पियूष गोयल व ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री डॉन फॅरेल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषण केली.

Goyalसध्या भारत व ऑस्ट्रेलियामधील वार्षिक द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलर्स इतका आहे. त्यावर समाधानी राहता येणार नाही. ऑस्ट्रेलियाला भारताशी अधिक मोठ्या प्रमाणात व्यापार करायचा आहे. पुढच्या पाच वर्षात या द्विपक्षीय व्यापाराची व्याप्ती 40 ते 50 अब्ज डॉलर्सवर नेण्याची ऑस्ट्रेलियाची इच्छा आहे, असे या देशाचे व्यापारमंत्री डॉन फॅरेल यांनी व्यक्त केली. भारताचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे.

सध्या भारत व ऑस्ट्रेलियामध्ये मुक्त व्यापारी करार तसेच त्याच्या पलिकडे जाणाऱ्या व्यापक करारावर वाटाघाटी सुरू आहेत. या वाटाघाटींवर दोन्ही देशांच्या व्यापारमंत्र्यांनी असमाधान व्यक्त केले. दोन्ही देशांनी आपल्यासमोर याहूनही अधिक महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवावे, अशी अपेक्षा व्यापारमंत्री गोयल व व्यापारमंत्री फॅरेल यांनी व्यक्त केली. उभय देशांचा व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे ध्येय आपण समोर ठेवायला हवे आणि भारत व ऑस्ट्रेलिया मिळून हे ध्येय नक्कीच गाठू शकतील, असा विश्वास ऑस्ट्रेलियाच्या व्यापारमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

ऑस्ट्रेलियाकडे प्रगत तंत्रज्ञान, उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या संस्था, क्रीडा क्षेत्राचा अनुभव आहे, याचा लाभ भारत घेऊ शकतो, असे फॅरेल यांनी सुचविले. तर भारत ऑस्ट्रेलियाला आपल्याकडील कुशल व गुणवत्ता असलेले मनुष्यबळ, औद्योगिक पाया व स्टार्टअप्सच्या आघाडीवरील अनुकूल व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करू शकतो, असा दावा फॅरल यांनी केला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड प्रमाणात दुर्मीळ खनिजांचा साठा असून कोळसा व इतर खनिजसंपत्तीचा पुरवठा भारताला करण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक असल्याचे दिसते आहे. त्याचवेळी भारताशी संरक्षणविषयक सहकार्य दृढ करण्याची तयारी ऑस्ट्रेलियाने केली आहे. या धोरणात्मक सहकार्याचा सकारात्मक प्रभाव भारत व ऑस्ट्रेलियाच्या इतर क्षेत्रातील सहकार्यावर पडत असल्याचे दिसते.

आधीच्या काळात चीन हा ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश होता. मात्र इंडो पॅसिफिक क्षेत्रात वर्चस्वस्वादी कारवाया सुरू करून चीनने ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला थेट आव्हान दिले होते. तसेच ऑस्ट्रेलियाच्या शेजारी असलेल्या छोट्या बेटदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून चीन ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला धक्का देण्याची तयारी करीत होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली. याचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांवर झाला. चीनने ऑस्ट्रेलियाकडून आयात कमी करून या देशाला धडा शिकविण्याचा सपाटा लावला होता. चीनने आपल्या विरोधात व्यापारयुद्धच पुकारल्याचे ऑस्ट्रेलियाने म्हटले होते. भारताबरोबर व्यापारी सहकार्य वाढवून आपण चीनच्या या व्यापारयुद्धाला प्रत्युत्तर देऊ असे संकेत ऑस्ट्रेलियाने दिले होते. भारत व ऑस्ट्रेलियाच्या व्यापारी सहकार्याला ही धोरणात्मक पार्श्वभूमी लाभलेली आहे.

leave a reply